एमआयडीसी चौकातील अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन. 
पुणे

पुणे : कुरकुंभ अपघातातील वाहन करमाळा नगरपरिषदेचे

अमृता चौगुले

वाहन व वाहनचालक ताब्यात

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसी चौकात शुक्रवारी (दि. २६) शेतमजुरांना उडविणारे वाहन (एमएच ४५ डी ००१२) हे करमाळा नगरपरिषदेचे असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

या भीषण अपघातात मायलेकरांसह तिघांचा मृत्यू झाला होता; तर तिघे जखमी झाले होते. रविवारी (दि. २८) संबंधित वाहनचालक व वाहन कुरकुंभ पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सुशील लोंढे यांनी दिली. रावसाहेब नामदेव कांबळे (वय ५६, रा. करमाळा, जि. सोलापूर) असे वाहनचालकाचे नाव आहे.

कुरकुंभमधील एमआयडीसी चौकात २६ रोजी अज्ञात वाहनाने सहा जणांना उडविले होते. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. एक अल्पवयीन मुलगा व मुलगी, अन्य एक, असे तिघे जखमी झाले. जखमींवर दौंडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत व जखमी हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. अपघातानंतर वाहनचालक जखमींना मदत न करता फरार झाला. याप्रकरणी नीलेराम मोहन लोद (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेचा तपास लोंढे यांच्याकडे आहे.

अपघातानंतर फरार झालेले वाहन हे महाराष्ट्र शासनाचे असल्याची चर्चा होती. या घटनेनंतर तिसऱ्या दिवशी सदर वाहन करमाळा नगरपरिषदेचे असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी वाहन व चालकास ताब्यात घेतले. वाहनावर 'महाराष्ट्र शासन' असा उल्लेख आहे. या वाहनाची समोरची काच फुटली असून, पुढील भाग चेपला आहे.

या घटनेचा तपास दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुशील लोंढे, पोलिस हवालदार शंकर वाघमारे, श्रीरंग शिंदे, पोलिस नाईक राकेश फाळके, अमोल राऊत, कोळेकर यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT