नारायणगाव: पावसाने उघडीप दिल्याने जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
विशेषतः फ्लॉवर 7 ते 8 रुपये प्रति किलो, तर कोबी 10 ते 12 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. वांगी 4 रुपये किलो, तर काकडी 10 ते 12 रुपये किलो दराने विकली गेली. गवारीला मात्र चांगला भाव मिळाला असून, ती 90 ते 95 रुपये प्रति किलो दराने विकली गेली. (Latest Pune News)
गाजर, घेवडा, घोसाळी, चवळी, डांगर भोपळा, ढोबळी मिरची, मका वांगी, भुईमुगाच्या शेंगा, आंब्याच्या कैर्या, कारले, भेंडी, दुधी भोपळा, दोडका, वालवड मिरची, बीट, तोंडली, लिंबू आणि विविध प्रकारच्या मिरच्यांचे दरही कमी झाले आहेत. लसूण वगळता इतर सर्व भाजीपाला कमी दराने विकला जात आहे.
मे महिन्यात झालेल्या पावसामुळे तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. जे थोडेफार पीक वाचले, ते मार्केटमध्ये आणूनही उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करत आहे. महागडी औषधे, खते आणि मशागतीचा खर्च पाहता, सध्याच्या भावात शेतकर्यांचे भांडवली खर्चही फिटत नाहीये.