पुणे : पावसामुळे तोड कमी प्रमाणात झाल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात काकडी आणि ढोबळी मिरचीची आवक घटली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी राहिल्याने या फळभाज्यांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. तर, राज्यासह परराज्यातून आवक वाढल्याने हिरव्या मिरचीच्या भावात दहा टक्क्यांनी उतरले. उर्वरित सर्व फळभाज्यांची आवक-जावक कायम राहिल्याने दर स्थिर होते.(Latest Pune News)
बाजारात नव्या कांद्यासह जुना कांदाही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. मात्र, पावसाच्या तडाख्याने नव्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. तर, साठवणुकीतील कांद्यामध्येही खराब मालाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे, कांद्याला दर्जानुसार भाव मिळत आहे. हिमाचल प्रदेश येथील मटारचा हंगाम सुरू झाला आहे. तर, स्थानिक मटारचा हंगाम संपल्याने बाजारात या मटारची आवक घटली आहे. मात्र, बाजारात होत असलेल्या आवकेइतकीच मागणी असल्याने त्यांचे दर टिकून आहेत.
गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि. 2) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश येथून हिरवी मिरची 20 टेम्पो, इंदोर येथून गाजर 2 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 450 ते 500 क्रेट, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो आणि पावटा 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक येथून भुईमूग 2 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची 8 ते 10 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 45 ते 50 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून भेंडी 5 टेम्पो, गवार 3 टेम्पो, टोमॅटो 8 हजार क्रेट, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, मटार 40 ते 50 गोणी, कांदा सुमारे 100 टेम्पो इतकी आवक झाली होती.