

पुणे ः पुण्यात पुन्हा एकदा बेदरकार वेग, मद्यधुंद ड्रायव्हिंग आणि पार्टी कल्चरचा कहर दिसून आला. बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली रविवारी पहाटे कारचा भीषण अपघात होऊन दोघा तरुणांचा जागीच व एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कारमधील मद्याच्या बाटल्या, सीसीटीव्ही फुटेजमधील वेगाचा अंदाज आणि घटनास्थळावर कारचा झालेला चुराडा पाहता हा ड्रंक अँड ड्राईव्हचाच प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आला आहे. नेमके तिघे कुठून कुठे चालले होते, याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, या अपघातामुळे पोर्शे अपघाताच्या भयावह आठवणी ताज्या झाल्या. यश भंडारी, ॠत्विक भंडारी आणि खुशवंत टेकवाणी अशी अपघातात मरण पावलेल्या तिघांची नावे आहेत. यश आणि ऋत्विक हे चुलत भाऊ असून दोघेही उच्चशिक्षित, नोकरी करणारे होते. खुशवंत हा पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये बी.टेकचा विद्यार्थी होता. त्यांचा परस्परांशी संबंध कसा आला, तसेच हे तिघे एकत्र कसे आले, याचा तपास केला जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडी रुबी हॉलकडून बंडगार्डनच्या दिशेने अत्यंत भरधाव वेगात येताना दिसत आहे. अचानक नियंत्रण सुटल्याने ती थेट मेट्रोच्या खांबावर धडकली आणि उलटी फिरली. तपासानुसार कारचा प्रतितास वेग 100 किलोमीटरपेक्षा जास्त असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.