

maharashtra olympic association election ajit pawar muralidhar mohol
पुणे : शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकमताने चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, इतर कार्यकारिणीची सोमवारी सकाळी निवड करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या या विशेष बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. एन सरदेसाई उपस्थित होते. असोसिएशनची 2025-29 च्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच राजकीय रंग चढला होता.
या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला बैठक होऊन अजित पवार यांना दोन वर्षे, तर मुरलीधर मोहोळ यांना दोन वर्षे अध्यक्षपद देण्याचा निर्णय अंतिम झाला. त्याप्रमाणे असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण बैठक रविवारी पार पडली. या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सरदेसाई यांनी अजित पवार यांच्या विरोधात अध्यक्षपदासाठी अर्ज नसल्याने त्यांना बिनविरोध घोषित केले, तर मुरलीधर मोहोळ यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होऊन त्यांचे नाव घोषित करण्यात आले.
दरम्यान, सरचिटणीस, सहसचिव, खजिनदार यांसह इतर पदांची आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या सर्व पदांची निवड सोमवारी सकाळी 11 वाजता होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
असोसिएशनची पुढची सर्वसाधारण बैठक रविवार, दि. 23 नोव्हेंबला होणार आहे. असोसिएशनमध्ये कार्यकारिणी 20 आणि 8 नियुक्त पदाधिकारी अशी 28 संघटकांची निवड केली जाणार आहे. सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेऊन कार्यकारिणी निवडीचे सर्व अधिकार पवार यांच्याकडे देण्यात आले. सचिव पदावर एकमत न झाल्याने कार्यकारिणी जाहीर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.