नितीन राऊत
जेजुरी : जेजुरी औद्योगिक वसाहतीला नाझरे धरण व वीर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या नाझरे धरणातील पाणीसाठा संपत आला असून या धरणातून केवळ 50 टक्के पाणी उद्योगांना मिळत आहे. वीर धरणावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्वतंत्र पाणी योजना असून वीर धरणातून एमआयडीसीपर्यंत 25 किलोमीटर पाणी उपसा करावा लागत आहे. हे एकदम खर्चिक आहे.
स्थानिक तरुणांना उद्योगातील कौशल्य प्रशिक्षण संस्था तालुक्यात वाढविणे आवश्यक आहे. जेजुरी औद्योगिक वसाहतीजवळून राष्ट्रीय महामार्ग विकसित होतोय. हडपसर ते जेजुरी एमआयडीसी पीएमपीएमएल बससेवा सुरू झाल्याने कामगारांना सोयीस्कर झाले आहे. तसेच जेजुरी स्मशानभूमी ते कोळविहीरे हा उद्योग समूहातून जाणार्या रस्त्याचे काम अनेक दिवस रखडले होते, ते नुकतेच सुरू झाले आहे. जेजुरी औद्योगिक वसाहतीत राजकीय हस्तक्षेप नाही. तसेच गुंडगिरीदेखील नाही, त्यामुळे या उद्योग समूहातील उद्योजक निर्भयपणे कारखानदारी चालवीत आहेत.
भविष्यकाळात येथील उद्योग विकसित होण्यासाठी स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मोठे उद्योग आणण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाझरे धरणावरून 25 ते 30 मीटर तर वीर धरणावरून 250 मीटर उंचीवरून पाणी उचलावे लागत आहे. त्यामुळे तिप्पट खर्च या योजनेवर करावा लागत आहे. सध्या पाणी टंचाईमुळे वीर धरणावरील योजना सुरू करण्याचे काम चालू झाले आहे, असे उपअभियंता विजय आनंद पेटकर यांनी सांगितले.
जेजुरी औद्योगिक वसाहतीचा विस्तार होण्यासाठी विस्तारीकरणाच्या पाचव्या टप्प्याचे काम होणे आवश्यक आहे. या वसाहतीत भारत फोर्ज, टेम्टेशन फूड, ब्रायोशिया आदी कंपन्या दहा वर्षांपासून बंद असल्याने त्या जागा अडकून पडल्या आहेत. 688 एकर जागेपैकी सुमारे 200 एकर जागा पडून आहे. ही जागा एमआयडीसीने ताब्यात घेऊन इतर उद्योगांना देणे आवश्यक आहे. तसेच उद्योजकांनी गेल्या पंधरा वर्षांपासून निवासी भूखंडासाठी मागणी केली असून हे निवासी भूखंड अजूनही मिळालेले नाहीत.