Pune Zp Election 2026 Who is veerdhaval jagdale
दौंड: वीरधवल उर्फ (बाबा) जगदाळे हे दौंड तालुक्यातील महत्त्वाच्या राजकीय घराण्यातून येतात. वीरधवल जगदाळे यांचे वडील कै, बाळासाहेब जगदाळे, व मातोश्री उषादेवी जगदाळे हे दोघेही प्रदीर्घ काळ दौंडचे विधानसभेचे सदस्य होते त्यामुळे जगदाळे कुटुंबीयांना राजकीय वारसा आहे.
वीरधवल जगदाळे स्वत: सलग तिसऱ्यांदा पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. नुकत्याच झालेल्या फेब्रुवारी २०२६ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी आपला विजय कायम राखला. सध्या त्यांची पुतणी दुर्गादेवी या दौंडच्या नगराध्यक्ष तर बंधू इंद्रजीत हे नगरसेवक आहेत.
जगदाळे यांच्या कार्याचा मुख्य विस्तार पुणे जिल्हा परिषद, दौंड नगरपालिका तसेच सहकार आणि राजकारणात दिसून येतो. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निष्ठावंत मानले जातात. दौंडमधील पक्षाची बांधणी आणि स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक असते. दौंड नगरपरिषद निवडणुकीत (२०२५) राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांना स्थानिक राजकारणात अचूक नियोजनासाठी ओळखले जाते.
सिंचन आणि शेती या त्यांचा आवडता विषय आहे. यासह सहकार क्षेत्रात त्यांची विशेष रुची आहे. दौंड हा शेतीप्रधान तालुका असल्याने, नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पासारख्या पाणी योजनांच्या पाठपुराव्यात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते सक्रिय असतात. यासह सहकारातील रुची आणि मूळ पिंड यामुळे ते दौंड शुगर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
त्या माध्यमातून त्यांनी दौंड तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना प्रगतीपथावर नेले आहे. यासह दौंड आणि परिसरातील तरुणांचे संघटन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या याच राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील संघर्षाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतल्याचे दिसत आहे.