परिंचे: श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात महिलांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिला भाविकांनी नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात महिलांनाही सोडण्यात येत होते. परंतु, आता पुन्हा बंदी करण्यात आली आहे.
श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते. काही महिन्यांपूर्वी श्रीनाथ मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्यात येत होता. परंतु, आता महिलांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. महिलांना बाहेरील गाभाऱ्यातच दर्शन घेण्यासाठी पुजारी वर्ग दरडावतात. त्यामुळे महिलांना लांबूनच दर्शन घ्यावे लागत आहे.
सुरुवातीला ‘मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाही’ असा फलक होता. परंतु, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व महिलांनी आक्षेप घेतल्यानंतर देवस्थान ट्रस्टने फलक काढून टाकला. मंदिरातील पुजारी दर्शनासाठी येणाऱ्या महिलांना मुख्य गाभाऱ्यात येण्यापासून मज्जाव करीत असल्याने त्यांच्यात आणि पुजाऱ्यांमध्ये अनेकदा वाद होत आहेत.
परंपरेच्या नावाखाली दुय्यम स्थान
देवाच्या गाभाऱ्यामध्ये श्रीनाथांच्या शेजारी जोगेश्वरी माता आहे. असे असूनही रूढी, परंपरेच्या नावाखाली स्त्रियांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही. याबाबत अनेक महिला भाविकांनी तीव नाराजी व्यक्त केली.
ट्रस्टी आणि पुजारी यांची टोलवाटोलवी
महिलांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश देण्यावरून पुजाऱ्यांना विचारले असता ट्रस्टींनी आम्हाला महिलांना आत सोडण्यास मनाई केल्याचे सांगितले जात आहे. ट्रस्टींना विचारले असता अशी कोणत्याही प्रकारची मनाई केली नसल्याचे ते सांगत आहेत. ट्रस्टी व पुजारी याबाबत एकमेकांवर टोलवाटोलवी करीत आहेत.
श्रीक्षेत्र वीर येथील मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात महिलांना प्रवेशास मनाई करण्यात येत होती, ती आता बंद करण्यात आली आहे. महिलांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेशास मज्जाव करू नये, असे सर्व पुजाऱ्यांना सूचित करण्यात येणार आहे.मोहनराव रावसाहेब धुमाळ, मुख्य विश्वस्त, देवस्थान ट्रस्ट