परिंचे: श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात अखेर पोलिस बंदोबस्तात आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला. गेले काही महिने येथे महिलांना प्रवेशबंदी करण्यात येत होती. त्यानुषंगाने दै. ’पुढारी’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही केली आहे.
सासवडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पवार यांच्या टीमने वीर देवस्थान मंदिराला भेट दिली. देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, पुजारी व इतर उपस्थित ग््राामस्थ यांच्याशी मंदिरात महिला प्रवेशाच्या अनुषंगाने कायदेशीर चर्चा केली व त्याच क्षणी उपस्थित असणाऱ्या महिलांना देवाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश देण्यात आला, तसेच पुजाऱ्यांनीही महिलांना गाभाऱ्यात येण्यापासून रोखू नये, अशा प्रकारच्या सूचना देवस्थान ट्रस्ट व पोलिस प्रशासनाने केल्या आहेत.
दरम्यान, दै.‘पुढारी’ने याची दखल घेऊन या महिलांना दुय्यम वागणूक देणाऱ्या प्रश्नाला वाचा फोडल्यामुळे अनेक महिला भाविकभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुनील धुमाळ, अमोल धोंडीबा धुमाळ, माजी सरपंच भगवान वाघ, विराज धुमाळ, प्रसाद गुरव, विजू गुरव, पोलिस हवालदार संदीप पवार तसेच महिला भाविकभक्त उपस्थित होत्या.
श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथांच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाकारणे हे गंभीर व घटनाविरोधी आहे. याचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करते. कायद्याने धर्मस्थळांवर कोणाला बंदी करता येणार नाही. तत्परतेने महिलांना न्याय देण्यासाठी प्रशासनाचे मनापासून आभार आणि कौतुक आहे. परंतु, देवस्थान ट्रस्टनेही आपल्या कायदेशीर जबाबदारीचे भान ठेवून आपले कार्य केले पाहिजे.ॲड. सरला तिवारी, उपाध्यक्षा, सासवड वकील बार असोसिएशन
श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेशबंदी करणे बेकायदेशीर असून, हे पूर्णतः चुकीचे व महिला-पुरुष भेदभाव करणारे कृत्य आहे. रूढी-परंपरेच्या नावाखाली महिलांना प्रवेश नाकारणे, हे घटनेचे उल्लंघन असून, असे केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.कुमार कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सासवड