अमृत भांडवलकर
सासवड: वीर गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. वीर व भिवडी गणात यापूर्वी शिवसेना विजयी झाली आहे. याही निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा विजय मिळविण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. त्यामुळे शिवसेना वर्चस्व राखणार की शिवसेनेचा विजयरथ भाजप रोखणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Latest Pune News)
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वीर गटातील गावांनी आमदार विजय शिवतारे यांना मोठे मताधिक्य दिले. सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही असेच चित्र राहिले. वीर आणि भिवडी गणात विजय शिवतारे यांना १५,०७५, संजय जगताप यांना ११,९४८ तर संभाजी झेंडे यांना ५,३०० मतदान झाले. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दिलीप आबा यादव विजयी झाले होते. या वेळी वीर गटातील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. स्थानिक गणिते राजकीय समीकरणे बदलू शकतात, अशी चर्चा आहे.
वीर गट सर्वसाधारण झाल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. शिवसेनेच्या गोटात दिलीप आबा यादव, हरिभाऊ लोळे, समीर जाधव, अजित जाधव, कुंडलिक जगताप तर शैलेश तांदळे, पिनूशेठ काकडे, गणेश जगताप, विठ्ठल मोकाशी अशा नावांची भाजपच्या गोटात चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बबूसाहेब माहूरकर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद जगताप, राजेंद्र धुमाळ, राहुल गायकवाड यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
वीर गणाचा विचार करता या गटावर शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या अर्चना समीर जाधव या निवडून आल्या होत्या. शिवसेनेच्या गोटात सागर करवदे, काका राऊत, विजय साळुंखे, अमोल धुमाळ, साहिल यादव यांच्या नावाची चर्चा आहे. तर तुषार माहूरकर, संतोष धुमाळ, डॉ. संदीप नवले, सुधीर धुमाळ यांची भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून उत्तम धुमाळ, शरद जगताप, राजेंद्र धुमाळ, सागर धुमाळ तर शरद पवार गटात पुष्कराज जाधव, विश्वास जगताप यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. वीर गणात शिवदास शितोळे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.
भिवडी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांच्या पदरी निराशा आली. मात्र, आता ते घरातील महिलेला उमेदवारी मिळावा यासाठी कार्यरत झाले आहेत. या गणात शिवसेनेच्या अश्विनी विवेक दाते, सोनाली रवींद्र नवले, सोनाली सुभाष शिवतारे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपकडून संगीता चंद्रकांत बोरकर, स्नेहल यमाजी बाठे, सायली मनोज शिंदे प्रयत्नशील आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शीतल प्रदीप बोरकर इच्छुक आहेत. शरद पवार गटातून उज्वला प्रवीण पोमण यादेखील इच्छुक आहेत. मतदारांच्या गावभेटी, दिवाळी फराळ वाटप यातून इच्छुकांनी गट आणि गण पिंजून काढला आहे.