Vasudev Lokkala Tradition End Pudhari
पुणे

Vasudev Lokkala Tradition End: ओवी-नादाची परंपरा संपतेय? स्मार्टफोनच्या युगात वासुदेव लोककलेचे अस्तित्त्व धोक्यात, गावाचा मंगल नाद विरळ

मोरपीस टोपी, चिपळ्या आणि अभंग गात समाजप्रबोधन करणारा वासुदेव लुप्त होण्याच्या मार्गावर; छत्रपती शिवाजी महाराजांनीही ओळखले होते महत्त्व.

पुढारी वृत्तसेवा

काटेवाडी : तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि मोबाईलच्या आहारी गेलेली तरुणाई यामुळे पारंपरिक लोककलेचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे.

शतकानुशतकं भक्ती, ओवी, नाद आणि परंपरेचा वारसा जपत दारोदार भमंती करणारा वासुदेव आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ‌’वासुदेव आला हो वासुदेव आला... सकाळच्या पारी हरिनाम बोला” असा मंगल नाद ऐकत गाव जागे व्हायचे, ते दिवस आता विरळ झाले आहेत.

डोक्यावर मोरपिसांची टोपी, अंगरखा, कमरेस उपरणे, हातात चिपळ्या आणि विशिष्ट चालीत अभंग गात समाजप्रबोधन करणारा वासुदेव हा लोकमानसातील श्रद्धेचा दुवा होता. मात्र नोकरी-व्यवसायाकडे वळलेली तरुणाई आणि बदलते सांस्कृतिक वातावरण यामुळे या लोकपरंपरेतील रस कमी झाला आहे.

पूर्वी पहाटे घराबाहेर येऊन धान्य, भेटवस्तू देत वासुदेवांचे स्वागत केले जायचे. समाजातील संदेश, धार्मिक जागृती आणि मनोरंजनाची भूमिका ते समर्थपणे पार पाडत. ऐतिहासिक पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील वासुदेवांच्या कलेचा उपयोग करून त्यांच्या माध्यमातून गुप्त संदेश पोहचवून त्यांचे महत्त्व ओळखले होते. असे ऐतिहासिक पुरावेदेखील आहेत.

आज मात्र स्मार्टफोनच्या स्क्रीनमध्ये अडकलेले जीवन, करमणुकीची विविध साधने आणि जलदगती दिनचर्या यामुळे लोककलेची ओढ कमी होत चालली आहे. बोटावर मोजण्याइतकेच वासुदेव हा वारसा जपत आहेत.

लोककला तज्ज्ञांच्या मते, ‌’परंपरांविषयीची जागरूकता कमी झाली तर पुढील पिढीला या कलेची ओळखही होणार नाही. वास्तविक, या कलेचे दस्तावेजीकरण, कलाकारांना मानधन, शाळा-महाविद्यालयांमध्ये विशेष उपक्रम, सांस्कृतिक महोत्सवांत प्राधान्य दिले गेले तरच वासुदेवांची परंपरा टिकून राहू शकते. तंत्रज्ञानाच्या धावत्या युगात सांस्कृतिकतेची मूळे विसरली गेली तर अनेक परंपरा केवळ पुस्तकांत आणि आठवणीतच उरण्याची भीती जाणवू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT