पुणे : दान पावलं... दान पावलं... अशी साद घालत पहाटेच्या वेळी घराघरात चैतन्य देणारा वासुदेव आजच्या काळात स्वतःच हरवला आहे की काय, असा प्रश्न पुणेकरांना पडला. निमित्त होते, वंदन संस्थेद्वारे आयोजित विशेष जनजागृती मोहिमेचे.
पुण्यातील गजबजलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसर आणि फिनिक्स मार्केट सिटी यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी हातात फलक धरलेले वासुदेव उभे होते. मात्र, त्यांच्या हातात टाळ किंवा चिपळ्यांऐवजी एकच फलक होता. ‘वासुदेव हरवला आहे! आपण मला ओळखता का?’ हा फलक पाहून येणारे-जाणारे पुणेकर क्षणभर थबकले आणि आपल्या संस्कृतीबद्दल विचार करू लागल्याचे दिसून आले.
आपली समृद्ध परंपरा आणि संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. नव्या पिढीला वासुदेव म्हणजे कोण? हे कळावे आणि लोप पावत चाललेल्या लोककलांची जपणूक व्हावी, या उद्देशाने वंदन संस्थेने हे अनोखे पाऊल उचलले आणि गुरुवारी (दि.25) शहरात सर्वत्र जागृती केली. या मोहिमेचे नियोजन संस्थेचे अथर्व महाजन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यात कलाकार वैभव आणि रोहन यांनी वासुदेवाची वेशभूषा साकारून पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. टाळ-चिपळ्यांच्या गजरात नाही, तर शांतपणे उभे राहून त्यांनी समाज प्रबोधन केले.
वासुदेवांच्या वेशभूषेत हातात फलक घेऊन, वासुदेवांची आठवण करून देताना फर्ग्युसन रस्त्यावर वंदन संस्थेचे कलाकार.