पुणे

Ashadhi wari 2023 : काकडा… न्याहारी अन् मेट्रो सफारी ! वारकर्‍यांचा दिनक्रम राहिला व्यग्र

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'वारीत शिस्त महत्त्वाची, सकाळी उठलो, अंघोळ करून काकड्याला हजर झालो. पुण्यातच मुक्काम असल्यानं आज प्रवास नव्हता. न्याहारी करून विश्रांती घेतली. न्याहारी करताना एकानं मेट्रो जवळच असल्याचं सांगितलं होतं. एवढ्या वर्षांपासून वारीला येतोय, तर दिंडीतले बरेच जण ओळखीचे आहेत. त्याच्यातील काही जणांसोबत जाऊन मेट्रोने फिरून आलो…' लातूरचे गोविंद कवडे सांगत होते.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आणि श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी होता. पुण्यामध्ये विविध भागात मुक्कामी असलेल्या वारकर्‍यांनी पुण्यातील काही स्थळांना भेटी दिल्या. तर काही दिंड्यांमधील वारकरी उन्हामध्ये न फिरता दिवसभर आहे त्या ठिकाणी भजनामध्ये तल्लीन झाल्याचे चित्र होते. पुण्याच्या मुख्य पेठा वारकर्‍यांनी फुलून गेल्या होत्या. ठिकठिकाणी टाळ-मृदंगाच्या निनादात भजन ऐकण्यास मिळत होते.

माटेफळ या गावाहून आलेले मारुती देशमुख म्हणाले, 'दिंडीत ठरलेल्या सर्व उपक्रमांत सहभागी व्हावं लागतं. आमच्या दिंडीत बहुतांश शेतकरी आहेत. कष्ट करणारी मंडळी, हरिपाठ किंवा थोडेच अभंग पाठ असतात. पण महाराजांनी अगोदरच अभंग पाठांतराची स्पर्धा जाहीर केली होती. विश्रांतीचा दिवस असल्याने आज प्रत्येकाने पाठ केलेले अभंग सर्वांच्यासमोर म्हणून दाखवले. सर्वांनी त्यामध्ये आनंदाने सहभाग घेतला.'

काही दिंड्यांच्या ठिकाणी पुण्यातील वारकर्‍यांच्या नातेवाइकांनीदेखील हजेरी लावली होती. वारकर्‍यांसोबत थोडा वेळ भजन, कीर्तनात हे नातेवाइकदेखील रमल्याचे चित्र बघण्यास मिळत होते. पांडुरंग गुटलकर म्हणाले, 'मुलगा व्यवसायानिमित्त पुण्यातच असतो, तो भेटायला आला होता. दुपारी भजन झाल्यानंतर तो आम्हाला घेऊन आजूबाजूचा परिसर दाखवण्यास घेऊन आला आहे. आमच्याच गावातील काहीजण सोबत घेऊन आलो आहोत.'

सायंकाळी नारायण पेठेत कीर्तनाची तयारी सुरू होती. ट्रकलाच माईक लावून, काहीजण महाराजांना उभे राहण्याच्या ठिकाणी सतरंजी टाकत होते. तिथं असलेले निवृत्ती केकान म्हणाले, 'महाराजांचं कीर्तन होणार आहे. त्यासाठी ही तयारी सुरू आहे. दिंडीतले लोक पुण्यात फिरायला गेले आहेत. त्यांना चार वाजता येण्यास सांगितलं आहे. कीर्तनानंतर जेवण करून संध्याकाळी सर्वांना उद्या निघण्याबाबत महाराज सूचना करतील. त्यानुसार उद्या पहाटेच पुण्यातून दिंडी निघणार आहे.' सांयकाळी रस्त्याने जाताना काही ठिकाणी हरिपाठ ऐकू येत होता. पाऊल खेळत तरुण वारकरी हरिपाठात तल्लीन झाल्याचे नवी पेठेत बघायला मिळाले.

वेगवेगळ्या स्थळांना भेटी
वारकर्‍यांनी पुण्यातील विविध ठिकाणांना दिवसभर भेटी दिल्या. शनिवारवाडा बघण्यास आलेल्या अंबिका मोरे म्हणाल्या, 'तुकोबांच्या मुख्य पालखी सोहळ्यात दरवर्षी सहभागी होते. मी अभंग चांगले गाते म्हणून दररोज अभंग म्हणण्याची जबाबदारी माझ्याकडे असते. दुपारी भजन झाले, विश्रांती घेतल्यानंतर आता शनिवारवाडा बघण्यासाठी आले आहे.' ऐतिहासिक ठिकाणांसह विविध मंदिरात वारकर्‍यांची गर्दी दिसून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT