इंदापूर : इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक आणि लोणी देवकर गावच्या शिवारात सोमवारी (दि. 13) रोजी दुपारी तब्बल 35 एकरहून अधिक तोडणीस आलेला ऊस तसेच ठिबक सिंचन यंत्रणाही जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.(Latest Pune News)
सुनिता बलभीम शिंदे - 3 एकर, रूपाली सुनील शिंदे - 5 एकर, राजेंद्र ज्ञानदेव देवकर - 6 एकर, राधाबाई मारुती फाळके - 4 एकर, शोभा ज्ञानदेव भोसले - 2 एकर, अमोल गोरख राखुंडे - 1.5 एकर, सचिन गोरख राखुंडे - 1.5 एकर, दत्तात्रय नवनाथ राखुंडे - 2.5 एकर इतका ऊस जळाला. हा ऊस पुढील महिन्यात गाळप हंगाम सुरू होताच कारखान्याला दिला जाणार होता. मात्र अचानक आग लागून तो खाक झाल्याने शेतकऱ्याच्या हातात-तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आडसाली हंगामातील हा ऊस असून, एकरी अंदाजे 70 ते 80 टन उत्पादन मिळण्याची शक्यता होती. आग लागल्यावर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु दुपारी वाऱ्याचा झोत असल्यामुळे आग जलद पसरली आणि एका तासात 35 एकरहून अधिक शिवार जळून खाक झाला.
शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने आगीच्या भागात अंतर निर्माण करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकऱ्यांनी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करण्याचाही प्रयत्न केला मात्र ती होऊ शकली नाही. शेतकऱ्यांनी नुकसान पंचनामे करून ठोस मदत करण्याची मागणी केली आहे.