Fake Document  Pudhari
पुणे

Vanpuri Land Fraud: वनपुरीतील १ कोटी ७९ लाखांच्या जमीन व्यवहारात बनावट ओळखपत्रांचा आरोप

मूळ जमीनमालक महिलेऐवजी तोतया उभी करून दोन दस्त नोंदविल्याचा आरोप; तिघांना अटक, इतर आरोपींचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

सासवड: वनपुरी (ता. पुरंदर) येथील कोट्यवधी रुपयांच्या जमीन व्यवहारात मूळ जमीनमालक महिलेच्या नावाने कथित बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार केले. तिच्याऐवजी तोतया महिला उभी करून दोन जमीन खरेदी दस्त नोंदवून तब्बल १ कोटी ७९ लाख रुपयांचा व्यवहार केला.

याप्रकरणी विनोद प्रल्हाद सुद्रिक (वय ४५, रा. कोंढवा, पुणे) यांनी सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने तपास हाती घेत बाबू ऊर्फ सुशील सोपान शिवरकर, दशरथ बबन जानकर आणि मोहन हिरामण गायकवाड या तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, प्रकरणातील इतर आरोपींचा तसेच तोतया महिलेचा शोध सुरू आहे. जमीन व्यवहारातील संपूर्ण आर्थिक व कागदपत्रांची साखळी तपासली जात आहे.

हा प्रकार दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सासवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घडला. बाबू ऊर्फ सुशील शिवरकर, दशरथ जानकर, अॅड. विद्या कामथे, मोहन गायकवाड, रोहित पवार, संतोष मेमाणे, तसेच 'प्रियाली परदेशी' या नावाने दस्तावर स्वाक्षरी करणारी कथित तोतया महिला अशा सात जणांविरुद्ध संगनमताने कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, वनपुरी येथील गट नं. २५२ मधील ७५ गुंठे आणि गट नं. २५८ मधील १४.५० आर जमीन प्रियाली राकेश परदेशी यांच्या मालकीची असल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या नावाने कथित बनावट ओळखपत्रे तयार करून दुसऱ्या महिलेला जमीनमालक म्हणून उभे करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

गट नं. २५२ मधील ४० गुंठे जमीन संजना लाल प्रसाद व ३५ गुंठे जमीन आदित शिशिर हिरे यांच्या नावे दस्त नं. १७८८/२०२५ द्वारे नोंदविण्यात आली. तर, गट नं. २५८ मधील १४.५० आर जमीन मनोज दत्तात्रय लोंढे यांच्या नावे दस्त नं. १७८९/२०२५ द्वारे नोंदविल्याचे नमूद आहे. या दोन्ही कथित व्यवहारांमध्ये अनुक्रमे २० लाख व ४ लाख रुपये चेकद्वारे, तर उर्वरित १ कोटी ५५ लाख रुपये रोख स्वरूपात घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे एकूण १ कोटी ७९ लाख रुपयांच्या व्यवहाराभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, दोन्ही जमीन व्यवहारांमध्ये 'प्रियाली राकेश परदेशी' यांची ओळख ॲड. विद्या कामथे यांनी करून दिल्याचा दावा तक्रारीत केला आहे. त्यामुळे कथित बनावट ओळखपत्रे, जमीन मालकीची पडताळणी, दस्त नोंदणीची प्रक्रिया आणि पैशांच्या देवाणघेवाणीची साखळी तपासाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे.

दस्त नोंदणीवेळी सादर केलेली ओळखपत्रे, छायाचित्रे, बायोमेट्रिक अथवा नोंदणीशी संबंधित डिजिटल माहिती, दुय्यम निबंधक कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या कथित देवाणघेवाणीशी संबंधित पुरावे तपासात महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.

तोतया प्रियाली कोण?

दस्त नोंदणीच्या वेळी प्रियाली परदेशी या नावाने उपस्थित राहिलेली महिला नेमकी कोण? तिची बनावट ओळख तयार कोणी केली? आधार-पॅनसह इतर कागदपत्रे कोणी उपलब्ध करून दिली? तसेच १ कोटी ७९ लाख रुपयांच्या कथित व्यवहारातील रकमेचा प्रत्यक्ष लाभ कोणाला झाला? या प्रश्नांची उकल पोलिस तपासातून होणे अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT