पुणे

पुणे : कुतूहलाने ’वंदेभारत’मध्ये चढला अन् दरवाजे झाले लॉक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नव्याने सुरू झालेल्या 'वंदेभारत' रेल्वे गाडीचे प्रवाशांना आकर्षण व मोठी उत्सुकता आहे. याच उत्सुकतेपोटी पुणे स्थानकावर उभ्या असलेल्या 'वंदेभारत'मध्ये 12 वर्षांचा मुलगा चढला आणि काही क्षणात दरवाजे लॉक होऊन गाडी धावू लागली. त्यामुळे मुलाला खाली उतरता आले नाही. इकडे मुलाचे कुटुंब मात्र पुणे स्थानकावरच राहिले. मुलगा गाडीत अडकल्यामुळे आईला रडूच कोसळले. मात्र, रेल्वे अधिकार्‍यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्परता दाखवली.

रात्रीत मुलाची सुरक्षित ताब्यात घेऊन त्याच्या आईकडे सोपवण्यात आले. जळगावला जाण्यासाठी प्रदीप आनंद गोपाळ (वय 12) हा बहीण व आई संगीतासोबत शनिवारी (दि.22) रात्री पुणे रेल्वे स्थानकावर आले. त्याचवेळी रात्री सव्वानऊच्या सुमारास मुंबईवरून सोलापूरला जाण्यासाठी 'वंदेभारत' रेल्वे पुणे स्थानकावर आली. कुतूहलाने प्रदीप गाडीत चढला. मात्र, अचानक पुढील प्रवासासाठी गाडी सुरू झाली. गाडीचे सर्व दरवाजे लॉक झाले. गाडीतून खाली कुठून उतरावे हे प्रदीपला काहीच कळेना. तोपर्यंत गाडीने पुणे स्थानक सोडले व सोलापूरच्या दिशेने सुसाट सुटली. आईला काहीच सुचेनासे झाले आणि ती प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरच रडू लागली. तेथील काही प्रवासी तिला तत्काळ स्टेशन मॅनेजर यांच्या दालनात घेऊन गेले.

थांबा नसतानाही वंदेभारत थांबली….

रात्रपाळीवर असलेले स्टेशन मॅनेजर अनिल तिवारी यांनी तत्काळ वंदेभारत गाडीतील एस्कॉर्टशी संपर्क केला आणि मुलाला ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. काही वेळाने एस्कॉर्टकडून मुलगा सापडल्याची माहिती मिळाली. मात्र, ही गाडी कुर्डूवाडी स्थानकाशिवाय थांबणार नव्हती. इकडे आई चिंतीत होती. त्यामुळे मुलाला तत्काळ त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करणे गरजेचे होते. गाडी सुपरफास्ट असल्याने या गाडीला मुंबई, पुणे, कुर्डूवाडी आणि सोलापूर येथेच थांबा आहे. अधिकारी तिवारी यांच्या विनंतीनुसार, दौंड स्थानकावर ही गाडी थांबवण्यात आली. आरपीएफच्या मदतीने मुलाला दौंड स्थानकावर रेल्वेतून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुणे स्थानकावरून दौंड येथे आलेल्या आईकडे मुलाला सोपवण्यात आले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT