Vaishnavi Death Case Rajendra hagawane Police Custody
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी अटक झालेल्या सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला शुक्रवारी पुणे कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दुसरीकडे आरोपींना न्यायालयात आणत असताना भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आरोपींच्या वाहनांवर टोमॅटो फेकत जोरदार घोषणाबाजी केली.
वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणात फरार असलेले आरोपी राजेंद्र हगवणे (सासरे), सुशील हगवणे (दीर) या दोघांना शुक्रवारी पहाटे स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली. संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांना शिवाजीनगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपींना 28 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एन. एच. बारी यांनी हे आदेश दिले.
कोर्टाबाहेर निदर्शने
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना न्यायालयात हजर करणार असल्याने भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या गेटजवळच ठाण मांडले होते. आरोपींना न्यायालयात आणताच कार्यकर्त्यांनी वैष्णवीचा बळी घेणाऱ्या आरोपींना फाशी द्या अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आरोपींच्या गाडीवर टोमॅटोही फेकले.
कस्पटे कुटुंबियांचं वकिलांच्या बार असोसिएशनला पत्र
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी बार असोसिएशनला पत्र लिहिले आहे. आरोपींचे वकीलपत्र कोणीही न घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 16 मे 2025 रोजी घडलेली घटना ही दुर्दैवी आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे, त्यामुळे मी आपणास विनंती करतो की आपण कोणीही वकीलपत्र स्वीकारू नये आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यात सहकार्य करावे, अशी त्यांनी पत्रात म्हटले आहे.
कोण होती वैष्णवी हगवणे?
वैष्णवी शशांक हगवणे (23) ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणेची ती सून आहे. भुकूम (ता. मुळशी) येथे 16 मेरोजी दुपारी साडेचारच्या सुमारास वैष्णवीने आत्महत्या केली. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिली आणि तेच वैष्णवीच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत अशी फिर्याद वैष्णवीचे वडील आनंद ऊर्फ अनिल साहेबराव कस्पटे (51, रा. कस्पटेवस्ती, वाकड) यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिली होती. यानुसार वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे (27), सासू लता राजेंद्र हगवणे (50), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (57), नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे (24), दीर सुशील राजेंद्र हगवणे (27, सर्व रा. भुकूम, ता. मुळशी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत सर्वांना बेड्या ठोकल्या आहेत.