Vadgaon Budruk Bridge Traffic Pudhari
पुणे

Vadgaon Budruk Bridge Traffic: वडगाव बुद्रुकच्या नव्या पुलाला विलंब; महामार्गावर ५ किमीच्या वाहतूक रांगा

मुंबई-बंगळुरू महामार्गावर कोंडीचा कहर; वाहनचालक, प्रवासी त्रस्त, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

धायरी: मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक येथील मुठा नदीवरील नवीन पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे. दररोज वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. वडगाव बुद्रुक नदीपुलापासून नवीन बोगद्यापर्यंत वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर लांबीच्या रांगा लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडविला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

वडगाव बुद्रुक परिसरातील पुलाच्या तोंडाशी पाच वेगवेगळ्या रस्त्यांवरील वाहने एकत्र येत असल्याने पुलावर वाहतुकीचा प्रचंड ताण निर्माण होत आहे. दुचाकी, चारचाकी, तसेच अवजड वाहने तासन्‌तास कोंडीत अडकून पडत आहेत. परिणामी, वडगाव बुद्रुक, धायरी, नऱ्हे आणि आंबेगाव परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी सचिन गौतम यांनी यापूर्वी पाहणी दौऱ्यादरम्यान हा पूल दोन महिन्यांत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, अद्यापही पुलाचे काम पूर्ण न झाल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. संतप्त नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेसाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स आणि इतर साहित्य तातडीने हटविण्याची मागणी केली आहे.

वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. वाहनांचा प्रचंड लोंढा सुरळीत करण्यासाठी पोलिसांना दिवसभर रस्त्यावर उभे राहून काम करावे लागत आहे. सातत्याने कोंडी सोडविताना पोलिसांचीही दमछाक होत आहे.

मुठा नदीवरील नवीन पुलाचे काम सुमारे वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले आहे. हा पूल सुमारे १२ मीटर रुंद आणि १५० मीटर लांबीचा असून, त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, काम पूर्ण होण्यास होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वडगाव, धायरी, नऱ्हे आणि आंबेगाव परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांची या त्रासातून सुटका करावी.
श्रीकांत जगताप, नगरसेवक
पाऊस थांबल्यास पुढील पंधरा दिवसांत पुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
सचिन गौतम, प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT