पुणे: यंदाच्या खरीप हंगामात सर्व बियाणे उत्पादक कंपन्या, वितरक आणि विक्रेत्यांनी केंद्र सरकारने विकसित केलेल्या ‘साथी पोर्टल’ प्रणालीवरूनच सर्व प्रकारच्या बियाण्यांचे वितरण व विक्री करून ते बियाणे शेतकर्यांना उपलब्ध करून द्यायचे आहे.
जेणेकरून बोगस बियाण्यांबाबचे गैरप्रकार होणार नाहीत. मात्र, या प्रणालीचा वापर न करता वितरण व विक्री झाल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा पुणे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने यांनी दिला आहे. (Latest Pune News)
शेतकर्यांनी बियाणे विक्रेत्यांकडून साथी पोर्टल प्रणालीवरूनच बियाणे खरेदी करण्याबाबत आग्रह धरावा, असे आवाहन करून त्यांनी कळविले आहे की, परराज्यात उत्पादित झालेले व महाराष्ट्रात वितरण व विक्री होणार्या बियाण्यांना साथी पोर्टल अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व बियाणे उत्पादक व विक्रेत्यांची नोंदणी साथी पोर्टलवर करण्यात येणार आहे.
साथी प्रणालीमुळे बियाणे उद्योगात पारदर्शकता, सुसूत्रता आणि विश्वासार्हता निर्माण होणार आहे. या पोर्टलमुळे बियाणे उत्पादक कंपन्या, वितरक व विक्रेते यांच्यात समन्वय वाढवून डिजिटल प्रणालीमुळे सर्व संबंधित घटक एका प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे व्यवस्थापन सोपे होणार आहे. तसेच बियाणे व्यवसायातील गैरप्रकाराला आळा घालण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
कृषी सह-संचालक कार्यालयाला आली जाग
कृषी आयुक्तालयातील सर्व कृषी संचालक यंदाच्या खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी शेतकर्यांना मार्गदर्शकपर माहिती गेली दोन महिने सतत प्रसिद्ध करीत आहेत. राज्यात एकीकडे खरीप हंगामातील पिकांच्या 24 टक्के तर पुणे जिल्ह्यातही पेरण्यांचा टक्का 20 टक्क्यांवर पोहोचला आहे. मंगळवारी (दि. 24) प्रथमच पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयास जाग आली आणि एकाच दिवशी दोन प्रसिद्धीपत्रके त्यांनी जारी केली.
पुणे विभागांतर्गत पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर असे तीन महत्त्वाचे जिल्हे असताना या कार्यालयाकडून प्रचार-प्रसिद्धीच्या नावाने बोंबच होती. एवढंच नाही, तर पुणे विभागाची खरीप आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.
ही बैठक होणार म्हणूनही सह-संचालक कार्यालयास त्याचे महत्त्व कळले नाही. प्रचार-प्रसिद्धीवर भर देण्याची शासनाची भूमिका असल्याचे विभागीय कृषी सह-संचालक कार्यालयास उशिराने का होईना कळल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेतकरी कंपन्या, गटांनी कृषी निविष्ठा परवान्यासाठी अर्ज करावेत
शेतकर्यांना खते, बियाणे, कीटकनाशके आणि इतर आवश्यक कृषी निविष्ठा चांगल्या गुणवत्तेची आणि वाजवी दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांनी कृषी निविष्ठा परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन गवसाने यांनी केले आहे. शेतकर्यांना एकत्रितपणे कृषी निविष्ठा खरेदी केल्यास पिकांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्यांना चांगल्या प्रतीची कृषी निविष्ठा मिळण्यास मदत होणार आहे.