शंकर कवडे
पुणे: हिर्या-मोत्यांनी सजविलेले मुकुट अन् दागिने... पैठणी अन् इरकलीने सजलेले पीतांबर, शेला अन् उपरणे... या स्वरूपात असलेल्या श्री गणेशमूर्ती घरोघरी विराजमान होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून, श्री गणरायाच्या मूर्तीवरील दागिन्यांत हिर्या-मोत्यांची पखरण करण्यासाठी डायमंड आर्टिस्टची लगबग वाढली आहे. गणरायाची आभूषणे आणि अलंकार, रंगबिरंगी खड्यांसह पीतांबर, शेला आणि फेटाही पैठणी आणि इरकलीने सजविण्यात आले आहेत.
आकर्षक रंगसंगती, पेहरावासह दागिन्यांत मुक्तहस्ते हिरे, कुंदन, मोत्यांची पखरण केलेल्या गणेशमूर्तीही शहरात दाखल झाल्या असून, मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवप्रमाणे घरगुती गणपतीमध्ये पीतांबर, शेला नेसवलेल्या मूर्तींचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. Ganesh Chaturthi
लाडक्या गणरायाचे रूप खुलवण्यासाठी बाप्पाच्या मुकुटापासून सोंडपट्टा, बाजूबंद, कंठीहार आदी आभूषणे, अलंकारांवर हिर्या-मोत्यांची पखरण करण्यात येत आहे. लेस, कुंदन, मोती, स्टोन चेन, बॉल चेन, रेडीमेड ब्रोच, भीकबाळी, शस्त्र, कापड आणि प्लास्टिकच्या फुलांचा वापराने या मूर्ती अधिक आकर्षक दिसू लागल्या आहेत. लखलखणार्या खड्यांमुळे गणरायाच्या मूर्तीला एक वेगळीच झळाळी मिळत असल्याने या मूर्तींना मोठी मागणी आहे. याखेरीज अन्य मूर्तींच्या तुलनेत त्याची किंमतही वीस ते तीस टक्क्यांनी अधिक असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. (Latest Pune News)
एरवी मुंबईमध्ये सार्वजनिक गणपतींना वस्त्र नेसविण्याचा असलेला ट्रेंड आत्ता शहरातील घरगुती गणपतींमध्ये आला आहे. पैठणी तसेच इरकलीमधून साकारलेल्या पीतांबर आणि शेले नसवलेल्या मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडून टाकतात. वस्त्र नेसविण्याच्या दृष्टीनेचे या मूर्ती घडविल्याने त्यांची सुबकता अधिकच उठावदार व आकर्षक दिसून येते. विविध प्रकारच्या कपड्यांचा वापर करून त्याला जरीची किनार जोडलेल्या या मूर्तींचा ट्रेंड यंदा शहरात पाहायला मिळत आहे.
दगडूशेठ, भाऊ रंगारी, अखिल मंडईसाठी लागतो कस गणेशमूर्तींवरील खडे जडविण्याचे काम अत्यंत जिकिरीचे असून, एकाग्रतेने करावे लागते. घरगुती गणेशमूर्तींपासून ते मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींच्या सजावटीचे काम करण्यात येते.
यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती, भाऊ रंगारी गणपती तसेच अखिल मंडईच्या गणेशमूर्तीवर कलाकुसर करताना कस लागतो. दगडूशेठ गणपतीची मूर्ती जास्त आभूषणे, अलंकारांनी नटलेली असते. तर, भाऊ रंगारी व अखिल मंडईच्या गणेशमूर्तीचा चेहरा तिरपा असल्याने वर्क करताना मोठे कष्ट पडतात. परिणामी, घरगुती मूर्तींवर काम करण्यासाठी दहा तासही कमी पडतात.
घरगुतीपासून सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींवर खडे जडविण्याचे काम केले आहे. एका घरगुती मूर्तीसाठी दोन तास लागतात तर मंडळाच्या भव्य मूर्तीवर कलाकुसर करण्यास सात ते आठ तास लागतात. बाप्पाची मूर्ती ही इतरांपेक्षा वेगळी असावी, अशी भावना प्रत्येकाची असते. त्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांसाठी आकर्षक मूर्ती घडविल्या आहेत. दरवर्षी या मूर्तींच्या मागणीत वाढ होत आहे.- आमिष भोज, डायमंड वर्क आर्टिस्ट