पुणे: वाढीव मिळकतकर व विकासकामे होत नसल्याच्या मुद्द्यावरून महापालिकेतून बाहेर पडून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन केलेल्या उरुळी देवाची-फुरसुंगी नगरपरिषदेने आता पाण्याचे टँकर आणि अन्य कामांच्या निधीसाठी महापालिकेकडे हात पसरले आहेत. दोन्ही गावांसाठी 40 कोटींच्या विकासकामांबरोबरच दररोज 180 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
फुरसुंगी व उरुळी देवाची ही गावे 2017 मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट झाली होती. मात्र, अपेक्षित विकासकामे न झाल्याच्या कारणावरून तसेच पालिकेत वाढीव कर भरावा लागत असल्याने या दोन्ही गावांनी महापालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दि. 11 सप्टेंबर 2024 रोजी या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात आली.
मात्र, आता स्वतंत्र नगरपरिषद स्थापन होऊन या गावांमधील प्रश्न कायम आहेत. परिषदेचे नगराध्यक्ष संते व उपनगराध्यक्ष ओंकार कामठे यांनी सभागृहनेते गणेश बिडकर यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. कचरा डेपोमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले असून, भूजल दूषित झाले आहे.
विहिरी व बोअरवेलमधील पाणी पिण्यायोग्य राहिले नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यासाठी दररोज सुमारे 180 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. नगरपरिषदेला मंजूर असलेला 24 एमएलडी पाणीपुरवठा महापालिकेने दररोज करावा तसेच होळकरवाडी व हांडेवाडी परिसरातून वाहणाऱ्या दूषित ओढ्यावर स्वतंत्र ड्रेनेजलाइन उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कचरा डेपोमुळे बाधित भागासाठी पूर्वीप्रमाणे विकासकामांसाठी निधी देण्याची मागणीही केली आहे. पूर्वी महापालिकेकडून प्रत्येक गावासाठी सुमारे 10 कोटी रुपये किंवा एकूण 20 कोटी रुपयांची विकासकामे केली जात होती. मात्र, नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर ही कामे थांबविण्यात आल्याचा आरोप केला आहे. आता दोन्ही गावांसाठी 40 कोटींची कामे करण्यात यावीत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.