राजगुरुनगर : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरबरोबरच युरिया खताची टंचाई भासू लागली आहे. खेड तालुका खरेदी-विक्री संघाच्या केंद्रात युरिया खरेदीसाठी शनिवारी (दि. 21) शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गॅस सिलिंडरबरोबरच आता युरियासाठीही शेतकऱ्यांना रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.
इस्रायल-इराण युद्धामुळे नैसर्गिक वायू पुरवठ्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. युरिया उत्पादन नैसर्गिक वायूवर अवलंबून आहे. आखातातील ओमान, कतार, सौदी अरेबिया आदी देशांकडून वायू आयात होतो. युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाल्याने गॅसपुरवठा विस्कळीत झाला आहे. खत कंपन्यांसाठी केंद्राने गॅस कोटा 70 टक्क्यांवर मर्यादित केल्याने युरिया उत्पादनावर परिणाम झाला आहे.
खेड तालुक्यातील सहकारी खरेदी-विक्री संघात शुक्रवारी रात्री उशिरा एक ट्रक (35 टन) युरिया उपलब्ध झाला. याची माहिती मिळताच शनिवारी भल्या सकाळी शेतकऱ्यांनी रांग लावली. उन्हाच्या तीव झळा असतानाही शेतकरी रांगेत उभे होते. मर्यादित आवक आणि मोठी मागणी यामुळे अनेक शेतकऱ्यांना युरिया मिळू शकला नाही. उन्हाळी हंगामातील भुईमूग, कांदा, भाजीपाला पिकांसाठी युरिया अत्यावश्यक आहे, पण टंचाईमुळे खत देण्यात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी जादा दराने युरिया विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारने खतसाठा पुरेसा असल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात टंचाई जाणवत आहे.
आधार कार्डनुसार एका शेतकरी व्यक्तीला एक युरिया खताची 45 किलोची गोणी 350 रुपयांना विक्री केली जात आहे. तुटवडा असला तरी कोणतीही भाववाढ करण्यात आलेली नाही. संघाकडे मागणी असल्याने अधिक युरिया उपलब्ध करून दिला जाणार आहे.नरेंद्र थिगळे, अध्यक्ष, खेड तालुका खरेदी-विक्री संघ