पुणे

उरुळी देवाची-फुरसुंगीसाठी शहरी गरीब योजना

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे तूर्तास महापालिकेतच असल्याचे राज्य शासनाने नुकतेच उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेने या दोन्ही गावांमधील नागरिकांना शहरी गरीब योजना लागू केल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना परवडणार्‍या दरात खासगी रुग्णालयातील चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने महापालिकेकडून शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत एक लाख रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना काही ठरावीक आजारांसाठी दोन लाखांपर्यंत तर इतर आजारांसाठी एक लाखापर्यंतचे उपचार महापालिकेच्या पॅनेलवरील रुग्णालयात केले जातात. महापालिकेच्या हद्दीतून उरुळी देवाची व फुरसुंगी ही दोन गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार ही गावे वगळण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केल्याने महापालिकेने एप्रिल 2023 पासून या दोन्ही गावांमधील नागारिकांना शहरी गरीब योजनेतून वगळले.

परंतु, या गावांना हद्दीतून वगळण्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्यावरील सुनावणीत राज्य शासनानेच ही दोन्ही गावे महापालिकेतच असल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर या दोन्ही गावांमधील नागरिकांना शहरी गरीब योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, या योजनेतील उत्पन्न अटीची मर्यादा एक लाखावरून एक लाख 60 हजार करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केला आहे. त्याला येत्या दोन दिवसांत मान्यता दिली जाईल व त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT