कराडमध्ये 200 गावे करणार चक्री उपोषण | पुढारी

कराडमध्ये 200 गावे करणार चक्री उपोषण

कराड, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याप्रकरणी सर्व दोषी पोलिस अधिकार्‍यांना निलंबित न करता त्यांना सेवेतून बडतर्फ करावे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच 50 टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी कराड तालुक्यातील सर्व दोनशे गावे 13 सप्टेंबरपासून चक्री उपोषण सुरू करणार आहेत. त्याचबरोबर पोलिस अधिकार्‍यांवर आठवडाभरात बडतर्फीची कारवाई न झाल्यास वेळप्रसंगी आमरण उपोषण सुरू केले जाणार असल्याचा इशारा कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.

कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून तालुक्यातील समाज बांधवांच्या उपस्थितीत मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधव एकच असून राज्य शासन केवळ ठराविक विभागातील समाज बांधवांना आरक्षण देत समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. शासनाची ही भूमिका संतापजनक असून महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून 50 टक्क्यांच्या आतच आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र सर्वच राजकीय पक्षांचे नेते ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत एकही शब्द बोलत नाहीत. मराठा समाज बांधव शेतकरी म्हणजेच कुणबी आहे आणि त्यामुळेच आरक्षण मिळणे, हा हक्क आहे.

त्यामुळे हा हक्क मिळवण्यासाठी 13 सप्टेंबरपासून कराडमध्ये मराठा समाज बांधव उपोषण सुरू करणार आहेत. हे उपोषण चक्री राहणार असून तालुक्यातील एक गाव दररोज उपोषणास्थळी उपस्थित राहून राज्य शासनाचा निषेध नोंदवणार आहेत. कराड तालुक्यात दोनशे गावे असून ही सर्व गावे जवळपास सहा महिने उपोषण सुरू ठेवणार आहेत. त्याचवेळी जालना घटनेस जबाबदार असणार्‍या सर्व दोषी पोलिस अधिकार्‍यांना सेवेतून निलंबित न करता त्यांच्यावर शासनाने बडतर्फीची कारवाई केली पाहिजे, अशी मराठा समाजाची भावना आहे.

वेळप्रसंगी काही समाज बांधव आमरण उपोषण ही सुरू करणार आहेत. त्यामुळे शासनाने आठवडाभरात बडतर्फीची कारवाई न केल्यास उद्भवणार्‍या परिस्थितीला सर्वस्वी शासन जबाबदार असेल असा इशाराही या बैठकीत मराठा समाज बांधवांकडून देण्यात आला आहे.

‘आरपीआय’, ‘हिंदू एकता’चा पाठिंबा 

कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाची बैठक सुरू असतानाच रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी बैठकीस उपस्थिती लावली. मराठा समाज बांधवांनी मतदानाचा अधिकार बजावत आरक्षण न देणार्‍यांना बाजूला करावे, असे आवाहन करत अशोकराव गायकवाड यांनी मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवला. तसेच हिंदू एकता आंदोलन समितीचे पदाधिकारी तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी बैठकीस उपस्थित राहून मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवला.

Back to top button