Manoj Jarange Patil Maratha reservation | मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली; उपोषणाचा नववा दिवस | पुढारी

Manoj Jarange Patil Maratha reservation | मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली; उपोषणाचा नववा दिवस

जालना ; पुढारी वृत्‍तसेवा उपोषणाच्या नवव्या दिवशी उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर याची माहिती दिली. जरांगे यांना सलाईन लावण्यात आले आहे. त्यांचा बीपी कमी झाला असून, शुगरही कमी झाली आहे. आरोग्य पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. (Manoj Jarange Patil Maratha reservation)

दरम्‍यान जरांगे पाटील यांना महाराष्‍ट्रातून पाठिंबा मिळत आहे. अनेक मंत्री, आमदार, नेते, सामाजिक कार्यकर्ते त्‍यांची भेट घेत आहेत. शासनाकडून त्‍यांच्याशी चर्चा सुरू आहे, मात्र अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही. त्‍यातच आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा नववा दिवस असून, त्‍यांची प्रकृती खालावली आहे. वैद्यकीय पथकाकडून त्‍यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. (Manoj Jarange Patil Maratha reservation)

मराठा आरक्षणप्रश्‍नी जालना येथे सुरु असलेल्या बेमुदत उपोषणस्थळी मनोज जरांगे-पाटील यांची काल सायंकाळी राज्याच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली होती. यावेळी बेमुदत उपोषणावर ठाम राहात, राज्‍य सरकारने आणखी चार दिवसांचा कालावधी घ्‍यावा; पण मराठा आरक्षणावर ठोस तोडगा काढावा, अशी मागणी जरांगे- पाटील यांनी राज्‍य सरकारच्‍या शिष्टमंडळाकडे केली होती.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी २९ ऑगस्टपासून जालना येथे जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी राज्याच्या शिष्टमंडळाकडून त्यांची मनधरणी सुरु आहे.  शिष्टमंडळात मंत्री गिरीष महाजन, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अर्जुन खोपकर आणि मंत्री अतुल सावे यांचा समावेश होता. मराठा आरक्षणप्रश्‍नी तोडगा काढण्‍यासाठी एक महिन्याचा वेळ मिळावा, अशी मागणी यावेळी महाजन यांनी केली.  आंदोलनात टोकाची भूमिका घेऊन चालत नाही असं महाजन म्हणाले. एका दिवसात जीआर निघणं अशक्य आहे, त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी जंरागे-पाटील यांना केली होती.

जरांगे-पाटील यांनी शिष्टमंडळाला आपली भूमिका स्पष्ट करत ठामपणे सांगितले की, मराठा आरक्षणप्रश्नी मी माघार घेणार नाही. मागील वेळेस सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिलेला होता मात्र तरीही कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नव्हता. त्यामुळे सध्या सरकारने यासंबंधी तात्काळ निर्णय द्यावा, या मागणीवर ते ठाम राहिले. सरकारने आणखी चार दिवसांचा कालावधी घ्‍यावा; पण मराठा आरक्षणावर ठोस तोडगा काढावा, असे आवाहन जरांगे- पाटील यांनी केले.

हे ही वाचा :

Back to top button