पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी, यासह विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट www.upsc.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. संबंधित पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांना येत्या 15 मेपर्यंत अर्ज करण्याची संधी दिली आहे.
सायंटिस्ट-बी, वैज्ञानिक अधिकारी, प्राध्यापक, व्याख्याता, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी अशा विविध पदांवर भारतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता आवश्यक आहेत.
सायंटिस्ट-बी पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, मान्यताप्राप्त प्रयोगशाळा किंवा संस्थेत इलेक्ट्रिकल स्टोअर्स, मटेरियल, मापन यंत्रांची चाचणी, कॅलिब्रेशन आणि मूल्यांकन करण्याचा एक वर्षाचा व्यावहारिक अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इतर पदांसाठी काहींना पदव्युत्तर पदवी आणि काहींना अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे.
वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सायंटिस्ट-बीसाठी, ओबीसी उमेदवारांचे वय 38 वर्षे असावे, तर सायंटिफिक ऑफिसरसाठी वयोमर्यादा सामान्य श्रेणीसाठी 30 वर्षे आणि एससीसाठी 35 वर्षे असावी. त्याचप्रमाणे इतर पदांसाठी देखील वयोमर्यादा वेगळी आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट आहे, तर इतर श्रेणीतील उमेदवारांना 25 रुपये शुल्क भरावे लागेल. शुल्क एसबीआयच्या कोणत्याही शाखेत रोख रक्कम जमा करून किंवा कोणत्याही बँकेच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून भरता येईल. उमेदवारांना श्रेणीनिहाय मुलाखतीत उत्तीर्ण गुण मिळवावे लागतील. सामान्य/ ईडब्ल्यूएससाठी 50 गुण, ओबीसीसाठी 45 गुण आणि एससी/ एसटी/ दिव्यांगसाठी 40 गुण असणे आवश्यक आहेत. मुलाखत एकूण 100 गुणांची असेल.