

खडकवासला: धायरी येथे सुरू असलेल्या सावित्री गार्डन ते सिंहगड रस्त्याची विकास आराखड्यात 100 फूट रुंदीची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्ता 30 फूट रुंदीचा करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या कायम राहणार असल्याचे धायरीकरांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. दरम्यान, याबाबत पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सावित्री गार्डन रस्त्यासह धायरीतील अनेक वर्षांपूर्वी रखडलेल्या चारही डीपी रस्ते नियोजनाप्रमाणे शंभर फूट लांबीचे सुरू करण्याचे आदेश दिले.
धायरी येथील बेनकर मळ्यातील धोकादायक कचरा प्रकल्प व रखडलेल्या चारही डीपी रस्त्यासाठी पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या समवेत सर्व पक्षीय पदाधिकारी नागरिकांची बैठक झाली. खासदार सुप्रिया सुळे या बैठकीत ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या. या बैठकीत आयुक्तांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. (Latest Pune News)
’आम आदमी पक्षा’चे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, माजी नगरसेवक सचिन दोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे त्रिंबक मोकाशी ,चैतन्य बेनकर, सनी रायकर, नीलेश दमिष्टे, आदित्य बेनकर, राजेंद्र कासेगावकर आदींनी समस्या मांडल्या.
धायरी येथील सावित्री गार्डन ते लोकमत प्रेस डीपी रस्ता कागदावर शंभर फूट लांबीचा आहे. मात्र, प्रत्यक्षात तीस फूट लांबीचा रस्ता केला जात आहे, त्यामुळे रस्त्यावर बेकायदा अतिक्रमणे होणार आहे.
अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार आहे, त्यामुळे या रस्त्यासह धायरी येथील सर्व चारही डीपी रस्ते शंभर फूट लांबीचे करण्यात यावेत. या रस्त्यावर पदपथ तसेच विजेचे दिवे बसविण्यात यावेत. याकडे नागरिकांनी आयुक्तांचे लक्ष वेधले त्या वेळी आयुक्तांनी चारही डीपी रस्ते शंभर फूट लांब अंतराचे तातडीने सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.
अतिरिक्त आयुक्त करणार कचरा प्रकल्पाची पाहणी
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, धायरीतील कचरा प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी पसरण्याबरोबरच कचरा प्रकल्पामुळे आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे परिसरात रहिवाशांवर मोठ्या दुर्घटनांची टांगती तलवार आहे. त्यामुळे याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. त्यासंदर्भात बोलताना आयुक्त म्हणाले, येथील कचरा प्रकल्पाच्या समस्येसंदर्भात अतिरिक्त आयुक्त दिवटे हे पाहणी करणार आहेत. त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल,’