

पुणे: नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकानुसार वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा- पदवीधर (नीट यूजी 2025) साठी प्रवेशपत्रे आज गुरुवारी (दि.1 मे) डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
नीट यूजी हॉल तिकीट एनटीएच्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर ऑनलाइन प्रसिद्ध केले जाईल, जिथून विद्यार्थी लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करून ते डाऊनलोड करू शकतील. कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेशपत्र वैयक्तिकरीत्या पाठवले जाणार नाही. दरम्यान, महाराष्ट्रासह देशात 4 मे रोजी नीट परीक्षा होणार आहे. (Latest Pune News)
परीक्षा पेन पेपर पद्धतीने घेतली जाईल. ही परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच सत्रात घेतली जाईल. या वेळी नीट यूजी परीक्षा देशातील 550 शहरांमधील सुमारे पाच हजार केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेची वेळ दुपारी 2 ते 5 अशी असेल. 2025 च्या नीट यूजी परीक्षेत विद्यार्थ्यांकडून एकूण 180 बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न विचारले जातील.
विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी तीन तास म्हणजेच 180 मिनिटे दिली जातील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी विद्यार्थ्यांना चार गुण दिले जातील. या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंगची पद्धत आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल. प्रश्नपत्रिका एकूण 720 गुणांची असेल. पेपरमध्ये भौतिकशास्त्र विषयाचे 45, रसायनशास्त्र विषयाचे 25 आणि जीवशास्त्र (प्राणिशास्त्र- वनस्पतिशास्त्र) या विषयांचे 90 प्रश्न विचारले जातील.
...असे करा हॉल तिकीट डाऊनलोड
नीट यूजी हॉल तिकीट 2025 जारी होताच विद्यार्थ्यांनी प्रथम एनटीएच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर वेबसाइटच्या होम पेजवर, ताज्या बातम्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉगइन करावे लागेल. त्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर उघडेल जिथून ते डाऊनलोड करता येणार आहे.