BRICS Pudhari
पुणे

UPI Digital Transactions In India: UPI ने रचला इतिहास; भारतात दरवर्षी २४० अब्ज डिजिटल व्यवहार

जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी ५० टक्के व्यवहार भारतात; ब्रिक्स परिषदेत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (एकात्मिक भरणा पद्धती)ने इतिहास रचला असून, भारतात दरवर्षी तब्बल २४० अब्ज व्यवहार होतात. हे प्रमाण जागातील व्यवहाराच्या ५० टक्के इतके आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ब्रिक्स परिषदेत प्रसारमाध्यमांना दिली.

अठरावी (ब्रिक्स : ब्राझिल, रशिया, इंडिया, चीन, साऊथ आफ्रिका, इजिप्त) राष्ट्रांची परिषद दिल्ली येथे १२ व १३ सप्टेंबर रोजी होत आहे. तत्पूर्वी, या परिषदेच्या बैठका भारतातील काही शहरात आयोजित केल्या आहेत. गेले पाच दिवस या परिषदेत सहभागी झालेल्या विविध देशांतील सदस्यांची परिषद पुण्यातील जे. डल्ब्यू. मेरियट या हॉटेलमध्ये सुरू आहे.

यात समारोपाच्या दिवशी प्रसारमाध्यमांना केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले पुण्यातील ही बैठक अत्यंत चांगली झाली. ब्रिक्समधील सातही राष्ट्रांचे डिजिटल व्यवहार आणि दूरसंचार या विषयावर एकमत झाले. एकमेकांशी याबाबत ज्ञान आणि तंत्रज्ञानावर कशी देवाण-घेवाण करता येईल, यावर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

काय म्हणाले केंद्रीय मंत्री सिंधिया

  • युनायटेड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) व्यवहारात भारतात मोठे परिवर्तन झाले, जे संपूर्ण जगातील सर्वोत्तम परिवर्तन आहे. आपल्याकडे दरवर्षी अंदाजे २४० अब्ज व्यवहार होतात ३ डिसेंबर रोजी, त्याचे मूल्य २ अब्ज डॉलर होते.

  • आज जगातील ५०% डिजिटल व्यवहार भारतात होतात.

  • आधारचे काम १८१ कोटी लोकांनी पूर्ण केले असून, त्याचा फायदा होत आहे.

  • ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले पुणे शहर, भारताच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेतही योगदान देत आहे.

  • आजच्या बैठकीत संचार, डिजिटल परिवर्तन यावर चर्चा झाली. ब्रिक्स देश मिळून आपल्या लोकांसाठी एक सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर डिजिटल भविष्य कसे साकार करू शकतो यावर भर होता.

आता प्रत्येक गावात ४ जी सेवा पोहोचली आहे. आपल्या देशात सर्वात वेगवान

५जी सेवा लागू करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ पर्यंत ९९ टक्‍के जिल्ह्यांमध्ये ५जी उपलब्ध आहे. ८६ टक्‍के लोकसंख्येला ५जी ची सुविधा मिळाली आहे. तीही लक्षणीयरीत्या कमी दरात. भारत केवळ एक आघाडीचा दळणवळण देशच नाही, तर एक कमी खर्चाचा देशही बनला आहे.

भारत-ब्राझीलदरम्यान सामंजस्य करार

बैठकीदरम्यान भारत आणि ब्राझीलने दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि ब्राझीलचे दूरसंचार मंत्री फ्रेडरिको डी सिपेरा फिलो यांनी स्वाक्षरी केली. या प्रसंगी केंद्रीयमंत्री सिंधिया म्हणाले, मला खात्री आहे की या सामंजस्य करारावरील स्वाक्षरीमुळे भारत-ब्राझील सहकार्य अधिक दृढ होईल. तसेच, सार्वत्रिक संपर्क व्यवस्था, सायबर सुरक्षा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता बांधणी आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण या क्षेत्रात मोठ्या सहकार्याचा मार्ग मोकळा होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT