पुणे : जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्य सरकारने मंजूर केलेले अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आजपर्यंत 47 हजार 424 मंजूर लाभार्थ्यांपैकी 40 हजार 986 लाभार्थी पात्र ठरले आहेत. मात्र, त्यापैकी तब्बल 30 हजार 89 लाभार्थ्यांनी अद्यापही ‘ई-केवायसी’ पूर्ण केलेले नसल्यामुळे त्यांना मदत वाटप करता आलेली नाही. त्यामुळे पात्र शेतकरी बांधवांनी तातडीने ‘ई-केवायसी’ पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.(Latest Pune News)
अवकाळी पावसाच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने जिल्ह्याकरिता 26 कोटी 92 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. याव्यतिरिक्त जून महिन्याचेही साडेसहा लाख रुपयांचे अनुदान 147 लाभार्थ्यांसाठी जाहीर झाले आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या शेतीचे मोठे नुकसान केले होते. महसूल, कृषी आणि पंचायती राज विभागाने केलेल्या पंचनाम्यांनुसार जिल्ह्यातील 994 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे 16 हजार 61 हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला होता. यामुळे 50 हजार 797 शेतकरी बाधित झाले होते.
या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 29 कोटी 22 लाख रुपयांची भरपाई मिळावी, असा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. यानंतर सरकारने एप्रिल व मे महिन्याची एकत्रित 26 कोटी 92 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली. याकरिता 47 हजार 424 लाभार्थी निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी 6,438 लाभार्थ्यांच्या माहितीत त्रुटी असल्याने त्यांना अद्याप पात्र ठरविण्यात आलेले नाही.
सध्या 40 हजार 986 लाभार्थी पात्र असून, त्यांना 24 कोटी 4 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. मदतीसाठी ‘ई-केवायसी’ करणे बंधनकारक आहे. आत्तापर्यंत 10 हजार 897 शेतकऱ्यांनी ‘ई-केवायसी’ पूर्ण केले असून, त्यांच्या खात्यावर थेट मदत जमा झाली आहे. मात्र अद्यापही 30 हजार 89 लाभार्थ्यांनी ‘ई-केवायसी’ न केल्याने त्यांचे 17 कोटी 49 लाख रुपयांचे अनुदान वितरित झालेले नाही. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी विनाविलंब ‘ई-केवायसी’ पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने पुन्हा केले आहे. दरम्यान, जूनच्या नुकसानीपोटी आलेली साडेसहा लाखांची मदतही 147 लाभार्थ्यांना लवकरच दिली जाणार आहे.