

पुणे : जैन बोर्डिंगच्या मालमत्ता विक्रीच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टचे विश्वस्त चकोर गांधी यांनी राजीनामा दिला असून, अनेक गोष्टी लपवून व्यवहार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Latest Pune News)
गांधी हे ट्रस्टचे सदस्य म्हणून गेली 30 वर्षे कार्यरत होते. ट्रस्टच्या कामकाजावर गंभीर आक्षेप घेत जैन बोर्डिंगची विक्री प्रक्रिया अपारदर्शक असल्याचा आरोप करीत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पूर्वी विश्वस्त मंडळाने वसतिगृहाची पुनर्बांधणी करून ते सुरू ठेवण्याचे आणि मंदिर तसेच ठेवण्याचे मान्य केले होते. मात्र, व्यवहारासंदर्भात पूर्ण माहिती न देता विक्रीच्या ठरावावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले.
धर्मादाय आयुक्तांकडे विक्रीची परवानगी मागताना सादर केलेल्या अर्जात वसतिगृहात अस्तित्वात असलेल्या श्री महावीर भगवान मंदिराच्या जागेचा कुठेही उल्लेख नव्हता. तसेच, धर्मादाय आयुक्तांच्या आदेशात आणि अंतिम विक्री करारपत्रातही मंदिराचा समावेश नसल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. कराराशी संबंधित कोणतेही नकाशे, आराखडे किंवा तांत्रिक दस्तऐवज सहीपूर्वी दाखविले गेले नाहीत. विकसकासोबतच्या कोणत्याही चर्चांमध्ये त्यांना सहभागी करून घेतले नाही.
या मालमत्ता विक्रीविरुद्ध संपूर्ण भारतातील जैन समाज, गुरू महाराज आणि माजी विद्यार्थ्यांनी तीव आंदोलन सुरू केले आहे. पुण्यातील ट्रस्टचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे त्यांना एकट्यालाच या आंदोलनाचा आणि आरोपांचा सामना करावा लागत आहे. त्यांनी इतर विश्वस्तांना वारंवार चर्चेसाठी पुढे येण्याची विनंती केली. पण, कुणीही प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी एक हितचिंतक म्हणून ट्रस्टला मालमत्ता विक्रीचा व्यवहार त्वरित रद्द करण्याची नम विनंती केली आहे. तसेच, धर्मादाय आयुक्तांकडील नोंदीतून आपले नाव वगळण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.