Pune Crime News Pudhari
पुणे

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून दुहेरी खून; नराधम अटकेत

आत्तापर्यंत पाच खून केल्याचे निषन्न

पुढारी वृत्तसेवा

पुणे: एकतर्फी प्रेमातून दुहेरी खून करणाऱ्या नराधमाला पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि सुपा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत बेड्या ठोकल्या. आत्तापर्यंत त्याने चार खून केल्याचे समोर आले आहे. जैतू चिंधू बोरकर (वय ४३, रा. कोयंडे, ता. खेड) असे या विकृत नराधमाचे नाव आहे. त्याने रंजना अरुण वाघमारे (वय ३५, रा. खांडपे, ता. कर्जत, जि. रायगड) आणि सुरज अंकुश वाघ (वय ३०, रा. वांगणी, ता. बदलापूर, जि. ठाणे) या दोघांचा खून केला होता.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काळखैरेवाडी (ता. बारामती) येथील खैरेपडळ येथे एका महिलेचा मृतदेह १९ जानेवारी रोजी सकाळी आढळून आला होता. तिच्या डोक्यावर जखमा झालेल्या होत्या. खुनाचा हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सुपा पोलिस ठाण्यातील पथक शोध घेत होते. घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

त्यात एका संशयित व्यक्तीची हालचाल दिसून आली. पोलिसांना घटनास्थळावर एक डायरी मिळाली होती. या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे लालासाहेब मारुती जाधव (रा. पिसर्वे, ता. पुरंदर) यांच्याकडे चौकशी केली. ते चिंचाची झाडे खरेदी करून चिंचा झोडण्याचे काम करतात. त्यांना फुटेज दाखविले असता त्यांनी संशयित जैतू बोरकर असल्याचे सांगितले. जैतू बोरकर याला खेड परिसरातून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केल्यावर जैतू बोरकरबरोबर कोयंडे परिसरात मजुरी कामासाठी रंजना वाघमारे व सुरज वाघ हे होते. जैतू बोरकर याचे रंजना वाघमारे हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. तो तिला त्याच्यासोबत राहण्याची जबरदस्ती करीत होता. महिलेने विरोध दर्शविल्यामुळे जैतू बोरकरने रागाच्या भरात १७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास कोयंडे गावातील चोर्‍याचा डोंगर परिसरात सुरज वाघ याच्या डोक्यात कोयत्याने मारहाण करून त्याचा खून केला. रंजना वाघमारे हिला घेऊन सुपा परिसरात निघून गेला.

१८ जानेवारी रोजी सुपा येथील काळखैरेवाडी परिसरात रात्रीच्या वेळी रंजना वाघमारे हिने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. ती पोलिसांकडे तक्रार करेल, या भीतीने जैतू बोरकरने तिच्या डोक्यात दगड मारून तिचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. खेड पोलिस ठाण्यात सुरज वाघच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैतू बोरकरला अटक केली. जैतू बोरकर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खेड पोलिस ठाण्यामध्ये २००७ व २०१८ मध्ये खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. २०२६ मध्ये दोन असे आत्तापर्यंत पाच जणांच्या खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण, सुपा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, अंमलदार ज्ञानेश्वर क्षीरसागर, अजय घुले, नीलेश शिंदे, स्वप्निल अहिवळे, अभिजित एकशिंगे, संदीप लोंढे, विशाल गजरे, महादेव साळुंखे, किसन ताडगे, रूपेश साळुंखे, राहुल भाग्यवंत यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT