वाघोलीत कौटुंबिक वादातून आईकडून मुला-मुलीवर चाकूने हल्ला
११ वर्षीय साईराज जयाभायचा जागीच मृत्यू
मुलगी धनश्री जयाभाय गंभीर जखमी; उपचार सुरू
आरोपी आई सोनी जयाभाय पोलिसांच्या ताब्यात
पती-पत्नीतील वादातून प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती
पुणे : पुढारी वृत्तसेवा
कौटुंबिक वादातून आईने आपल्या मुला आणि मुलीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वाघोली परिसरात आज सकाळी घडली. या घटनेत ११ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
साईराज संतोष जयाभाय (वय ११) असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी आई सोनी संतोष जयाभाय (रा. बाईफ रोड, वाघोली) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमी मुलगी धनश्री जयाभाय हिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जयाभाय कुटुंबीय मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून कामानिमित्त वाघोली येथे वास्तव्यास होते. आरोपी महिला सोनी जयाभाय आणि तिचा पती संतोष जयाभाय यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादातून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
आज सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या वेळी महिलेचा पती घरी उपस्थित नव्हता. मुलावर हल्ला केल्यानंतर आरोपी महिलेला आत्महत्या करण्याचाही विचार होता, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृत मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून जखमी मुलीवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करीत आहेत.