पुणे

विद्यापीठाचा एमबीएचा पेपर व्हायरल; संबंधित विषयाची परीक्षा रद्द

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे सध्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. शुक्रवारी (दि. 22) एमबीए प्रथम वर्ष प्रथम सत्रातील लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची परीक्षा होती. मात्र, चिखली येथील एका महाविद्यालयातून प्रश्नपत्रिका समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे पुणे , अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. त्यानुसार ऑक्टोबर 2023 या सत्राची परीक्षा 21 नोव्हेंबर पासून सुरळीतपणे सुरू झाली आहे. त्यात एमबीए अभ्यासक्रमाची परीक्षा 11 डिसेंबर पासून सुरू झाली आहे. 22 डिसेंबर रोजी एमबीए 2009 रिवाईज प्रथम सत्रातील लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची परीक्षा सकाळी 11 वाजता सुरू होणार होती.

परंतु, तत्पूर्वीच या विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेची संवेदनशीलता गोपनीयता लक्षात घेता विद्यापीठाने पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी पेपर व्हायरल झाल्याची घटना समोर आल्यामुळे रद्द करण्यात आलेला पेपर आता 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12.30 या वेळेत घेतला जाणार आहे.

विद्यापीठातर्फे घेतल्या जाणार्‍या लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यापीठाने हा पेपर रद्द केला आहे. सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT