पुणे

दु्र्दैवी ! मुलीचा लग्न सोहळा संपन्न झाला अन् बाप नंतर अपघाती गेला..

Laxman Dhenge

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा : मुलीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. आता काही वेळातच मुलीला सासरी पाठवण्याची वेळ झाली. त्या वेळी दुसर्‍या मुलीला नववधूसोबत पाठवायचे यासाठी तिची बॅग घरातून आणण्याकरिता निघालेल्या वधूपित्याच्या दुचाकीला टेम्पोने पाठीमागून उडविले. यामध्ये वधूपित्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वधूची बहीण ही गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना शनिवारी (दि. 30) दुपारी 4 वाजेच्या सुमारास बांधनवस्ती येथे घडली. या दुर्दैवी पित्याचे नाव संदीप दत्तात्रय पोपळघट (वय 52, रा. लोणी, ता. आंबेगाव) असे आहे. जखमी झालेल्या मुलीचे नाव ऋतुजा पोपळघट (वय 18) असे आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संदीप पोपळघट यांचे मूळ गाव देवी भोयरे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) आहे. सध्या ते लोणी (ता. आंबेगाव) येथे राहण्यास होते व पुणे येथे एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांची मोठी मुलगी अक्षदा हिचा विवाह शनिवारी (दि. 30) दुपारी तीन वाजता थापेवाडी येथील मंगल कार्यालयात पार पडला. विवाहाचे सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर लग्न झालेली मुलगी अक्षदा हिची पाठराखण करण्यासाठी धाकटी मुलगी ऋ तुजाला पाठवायचे होते. त्यामुळे ऋतुजा वडील संदीप यांच्याबरोबर लोणी येथील घरी कपड्यांची बॅग आणण्यासाठी दुचाकीने लोणीच्या दिशेने जात होती.

बांधनवस्ती या ठिकाणी गतिरोधक असल्याने संदीप यांनी दुचाकी सावकाश केली. त्याचवेळी पाठीमागून टेम्पोने जोरात धडक दिली. यात संदीप पोपळघट हे डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम लोणी व नंतर चाकण या ठिकाणी दाखल केले, तर मुलगी ऋ तुजाचा एक पाय फ्रॅ क्चर व दुसर्‍या पायाला मोठी दुखापत झाली. दरम्यान वडील संदीप पोपळघट यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे रविवारी निधन झाले.

अन् विवाहित मुलीने फोडला हुंबरडा

अक्षदाचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर तिला वडिलांच्या अपघाताची माहिती मिळाली. पण किरकोळ अपघात झाला असून, त्यांना लोणी येथे उपचारासाठी दाखल केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अक्षदा सासरी बारामती येथे वर्‍हाडी मंडळीसह दाखल झाली. दुसर्‍या दिवशी हळदीचा कार्यक्रम पार पडला आणि वडिलांच्या मृत्यूची बातमी अक्षदाच्या कानावर पडली. त्याचक्षणी अक्षदाने 'पप्पा… पप्पा' असा हंबरडा फोडला. त्या वेळी उपस्थितांची मने हळहळली. अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT