सातबारा उतारे अद्ययावत  pudhari
पुणे

Pune News: जिवंत साताबारा मोहिमेतर्गत राज्यात 5 लाख सातबारार्‍यांवर वारसांची नोंद

राज्यात सुमारे 22 लाखांहून अधिक सातबारा उतारे अद्ययावत करण्यात येणार आहेत

पुढारी वृत्तसेवा
  • अनावश्यक, कालबाह्य नोंदी काढण्याचे काम सुरू

  • जिवंत साताबारा मोहिम

पुणे : राज्य शासनाने जिवंत सातबारा मोहिमेला सुरूवात केल्यापासून आतापर्यंत सुमारे 5 लाखांहून अधिक उतारे जिवंत करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सुमारे 22 लाखांहून अधिक सातबारा उतारे अद्ययावत करण्यात येणार आहेत. याच मोहिमेत आता अनावश्यक आणि कालबाह्य नोंदी जसे ‘अपाक शेरा’, ‘एकुम’ (एकत्र कुटुंब मॅनेजर) नोंद’, ‘तगाई कर्ज’, बंडिंग बोजे’, ’भूसुधार कर’, ’इतर पोकळीस्त’ कमी होणार आहेत. त्यामुळे सातबारा उतारा अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत होणार असून, समजण्यास सोपा होणार आहे.

राज्यात 1 एप्रिलपासून ‘जिवंत सातबारा’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत सुमारे 5 लाख उतार्‍यांवर वारसांच्या नोंदी लावण्यात आल्या आहेत. राज्यात सुमारे 45 हजार गावे असून प्रत्येक गावात किमान 50 उतार्‍यांवर अशा नोंदी लावण्याची आवश्यकता असून, संपूर्ण राज्यात सुमारे 22 लाख उतार्‍यांवर या नोंदी लावण्यात येणार आहेत. हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या नोंदी करत असताना अधिकार अभिलेखात अद्यावतीकरणाची कार्यवाही करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यानुसार अनावश्यक व कालबाह्य नोंदी कमी करण्यात येणार आहेत.

या नोंदी होणार कमी

अनावश्यक नोंदींमध्ये अपाक शेरा कमी करणे, एकुम नोंद (एकत्र कुंटुंब मॅनेजर) कमी करणे, तर कालबाह्य नोंदींमध्ये तगाई कर्ज, बंडिंग कर्ज, भुसुधार कर्ज, इतर पोकळीस्त नोंदी, भूसंपादन निवाडा व बिनशेती आदेशानुसार प्रलंबित कजापचा अंमल सातबारा उतार्‍यावर घेणे, पोट खराब वर्ग ‘अ’ खालील क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात रुपांतरित करुन सातबारा उतार्‍यावर घेणे, नियंत्रित सत्ता प्रकार, शेरे प्रकारनिहाय पडताळणी करुन उतार्‍यावर घेणे, भोगवटादार वर्ग 1 व भोगवटादार वर्ग 2 असे स्वतंत्रपणे भूधारणा प्रकारनिहाय उतारा तयार करणे, अंतिम निस्तार पत्रकानुसार स्मशान भूमी व इतर निस्तार हक्काच्या नोंदी अधिकार अभिलेखात घेण्यात येत आहेत.

असा होईल फायदा

कालबाह्य नोंदीमुळे शेतकर्‍यांना जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार अथवा कर्ज प्रकरणे, भूसंपादन मोबदला इत्यादी कामकाजावेळी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. कालबाह्य आणि अनावश्यक नोंदी कमी झाल्यामुळे सातबारा उतारा अधिक सुटसुटीत होणार आहे. जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीचे वाद कमी होण्यास मदत होणार असून, शासकीय योजना आणि विकासकामांसाठी जमिनीची अचूक आकडेवारी उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT