इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांसह पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांना वरदान ठरलेले उजनी धरण 50 टक्के भरले आहे. इतिहासात प्रथमच मे महिन्यात मायनसमध्ये गेलेले उजनी पूर्णक्षमतेने भरणार की नाही? याची चिंता उजनीवर अवलंबून असणार्या सर्वांनाच होती. अखेर ऑक्टोबर उजाडताच पावसाने उजनीला तारले असून, उजनी धरण 50 टक्के भरले आहे. सध्या उजनीत 90 पूर्णांक 63 टीएमसी पाणीसाठा आहे. मात्र, उजनी पूर्णक्षमतेने भरण्यासाठी आणखी जवळपास 30 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. या वर्षी इतिहासात प्रथमच 6 मे 2023 रोजी उजनी धरण हे मायनसमध्ये गेले होते. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली. यंदाचा पावसाळा सुरू झाला.
मात्र, पावसाने ओढ दिल्याने ऑगस्ट संपून सप्टेंबर उजाडला, तरीही उजनी धरण पूर्णक्षमतेने भरू शकले नाही. मागील वर्षी 12 ऑगस्ट 2022 रोजी उजनी धरण 101 टक्के क्षमतेने भरले होते. म्हणजे उजनीत जवळपास 120 टीएमसीच्या आसपास पाणीसाठा होता. यंदा मात्र उलट चित्र होते. त्यामुळे उजनी भरणार की नाही, याची चिंता उजनीवर अवलंबून असणार्या सर्वांनाच होती. 1 ऑगस्टला धरण प्लसमध्ये आले आहे.
संबंधित बातम्या :
अखेरच्या पावसाने उजनीला तारले असून, गेल्या आठवडाभरापासून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाने उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उजनी धरण 50 टक्के क्षमतेने भरले आहे. 100 टक्के धरण भरल्यानंतर उजनी धरणामध्ये 117 टीएमसी पाणी साठते. वाढीव उंचीच्या प्रमाणामध्ये 110 टक्के धरण भरल्यानंतर 123 टीएमसी पाणी उजनी धरणामध्ये साठते. 117 टीएमसी पाणीसाठ्यापैकी 63 टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो. सध्या उजनीत 90 टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे. उजनी धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी आणखी जवळपास 30 टीएमसीहून अधिक पाण्याची आवश्यकता असणार आहे.
'उजनी' भरणार की नाही; शेतकर्यांना चिंता
उजनी धरण या वर्षी शंभर टक्के भरणार की नाही, याची चिंता 'बॅकवॉटर'वरील शेतकर्यांना लागून राहिली आहे. पावसाचा जोर मात्र कमी होऊ लागला आहे. उजनीच्या पाण्यावर ऊस, केळी, डाळिंब, पेरू ही बारमाही पिके अवलंबून असल्याने पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन करणे आता आवश्यक बनले आहे. उजनी धरणावरील जिल्ह्यातील धरणे भरल्याने विसर्ग नदीत सोडला जात आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने सुरुवात केल्याने गणेशोत्सवाच्या काळात धरण भरण्यास सुरुवात झाली होती.
त्यामुळे गणपती बाप्पा पावले, असेच म्हणावे लागेल. आता नवरात्रीत देवी आईने कृपा करावी व उजनी धरण पूर्णक्षमतेने भरले जावे, अशी अपेक्षा शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. या वर्षी लहरी पावसाचा फटका खरीप हंगामाला बसला आहे. या हंगामातील बाजरी, तूर, मूग, सोयाबीन, उडीद, कांदा, मका आदी पिके पावसाअभावी करपून गेली. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकरी सुखावला आहे.
पाणीपातळी
एकूण पाणीपातळी
– 494.335 मीटर
एकूण पाणीसाठा
– 90 .63 टीएमसी
उपयुक्त साठा
– 763.86 मीटर
(26.97 टीएमसी)
टक्केवारी – 50.35 टक्के
आवक दौंड – 18 हजार 175 क्युसेक