पळसदेव: "कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही", "ठेकेदारी पद्धत रद्द करा, सौरऊर्जा प्रकल्प रद्द करा", "उजनी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची" अशा घोषणांनी आज पाळदेव येथील उजनी परिसर दणाणून गेला. यावेळी झालेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान २ तास पाण्यात राहिल्याने २ महिला बेशुद्ध पडल्या. स्थानिक मच्छीमार बांधवांनी सौर ऊर्जा प्रकल्प आणि ठेकेदारी पद्धतीच्या विरोधात सोमवारी (दि. ३१) सकाळी ११ वाजता जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली.
गेल्या महिन्यात सोलापूर येथे झालेल्या आंदोलनात प्रशासनाने कोणताही तोडगा न काढल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र संताप होता. त्याचाच उद्रेक सोमवारी दिसून आला. सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन तब्बल तीन तास चालले; मात्र प्रशासनाकडून कोणतेही लेखी आश्वासन न मिळाल्याने दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास संतप्त आंदोलकांनी थेट पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन अधिक तीव्र केले.
यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा उभा करून नदीकिनारी आंदोलकांना अडविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आंदोलक मागे हटले नाहीत. "जोपर्यंत ठेकेदारी पद्धत आणि सौर ऊर्जा प्रकल्प बंद करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही," अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.