बावडा: उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सांडव्यामधून 5 हजार क्युसेक व पॉवर हाऊसमधून 1 हजार 600 क्युसेक याप्रमाणे एकूण 6 हजार 600 क्युसेकचा विसर्ग शनिवारी (दि. 25) सुरू आहे. परिणामी, इंदापूर तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीचे पात्र पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. (Latest Pune News)
उजनी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात बुधवारी (दि. 23) रात्री पाऊस झाल्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात पूर नियंत्रणाकरिता अचानकपणे रात्रीपासूनच वाढ करण्यात आली. त्यानुसार धरणाच्या सांडव्यातून शुक्रवारी सकाळी 6.30 वाजता भीमा नदीपात्रात 20 हजार क्युसेक क्षमतेने पाणी सोडले जात होते; मात्र पाऊस कमी झाल्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता कमी करून 10 हजार व त्यानंतर सकाळी 10.30 वाजता पुन्हा कमी करून तो 5 हजार क्युसेक करण्यात आला आहे. हा विसर्ग शनिवारी दिवसभर कायम ठेवण्यात आला.
उजनी धरणामध्ये शनिवारी सायंकाळी 6 वाजता 117.23 टीएमसी पाणीसाठा असून, त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा 53.57 टीएमसी आहे. सध्या धरणामध्ये 100 टक्के उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. दौंड येथून शनिवारी उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा 9 हजार 940 क्युसेक एवढा आहे.
दरम्यान, उजनी धरणातून दहिगाव उपसा जलसिंचन योजना, बोगदा व सीना माढा उपसा जलसिंचन योजना या सर्वांसाठी सोडले जाणाऱ्या पाण्याचा विसर्ग सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे. सध्या उजनी धरणाच्या फक्त कालव्यामधून 300 क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू आहे.