पुणे: बोपदेव घाटातील लुटीचा प्रकार ताजा असतानाच, आता डेक्कन पोलिस स्टेशनच्या दोन कर्मचार्यांनी एक तरुणी आणि तिच्या मित्राला धमकावून 20 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास येथील लॉ कॉलेज रोड परिसरात ही घटना घडली आहे.
संबंधित तरुणी आणि तिचा मित्र लॉ कॉलेज रोड परिसरात बसले असताना डेक्कन पोलिस ठाण्यातील गस्तीवर असलेले दोघे पोलिस तेथे आले. त्यांनी दोघांना एकांतात बसल्याबद्दल त्रास दिला, धमकावले आणि थेट एटीएममध्ये जाऊन 20 हजार रुपये आणायला लावल्याचा आरोप आहे. (Latest Pune News)
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर तरुणाने थेट डेक्कन पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याबाबत बोलताना डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले, दोन पोलिस कर्मचार्यांच्या विरुद्ध एका तरुणाने तक्रार केली आहे.
याबाबतची प्राथमिक चौकशी करून त्याचा कसूरी अहवाल पोलिस उपायुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. त्यांनी या दोन्ही कर्मचार्यावरती गुन्हा दाखल करण्याची परवानगी देखील दिलेली आहे.
आम्ही याबाबत तक्रारदाराशी संपर्क साधला असून, ते पोलिस ठाण्यात येतात, याबाबत गुन्हा दाखल होईल. पोलिसांकडून होत असलेल्या अशा बळजबरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचा सूर आहे.