

पुणे: महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत काँग्रेसचे शहराध्यक्ष बदलले जाणार नाहीत, असे काँग्रेसच्या एका गटाकडून सांगण्यात येत असले तरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत बोलाविलेल्या बैठकीत अनेकांनी नेतृत्वबदलाची मागणी उचलून धरली. त्यामुळे शहराध्यक्ष बदलाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
पुण्यातील पक्ष संघटनेची पाहणी करण्यासाठी नेमलेले निरीक्षक सतेज पाटील यांनी आपला अहवाल अद्याप प्रदेश काँग्रेसकडे सादर केलेला नाही. तसेच काल मुंबईत झालेल्या बैठकीलाही ते अनुपस्थित होते. त्यामुळे शहराध्यक्ष पदाबाबतची चर्चाच प्रदेशाध्यक्षांनी पुढे ढकलली. (Latest Pune News)
तरीही काहींनी बैठकीत तर काहींनी त्यांना प्रत्यक्ष भेटून नेतृत्वबदलाची मागणी लावून धरली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडेच शहराध्यक्ष पद राहते की निवडणुकीपूर्वी नेतृत्वबदल केला जातो, याबाबत उत्सुकता आहे.
महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बोलाविलेल्या या बैठकीला ब्लॉकचे अध्यक्ष गैरहजर होते. त्याबाबतही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. आगामी निवडणुका पक्षाने कशा पद्धतीने लढवाव्यात याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली, असेही सूत्रांनी सांगितले.