पुणे: सिंहगड रस्त्यावरील धायरी गाव, डीएसके विश्व परिसराला पाणी पुरवठा करणार्या बारांगणे मळ्यातील विहिरीत नाल्याचे पाणी शिरल्याने सर्व पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे आता हे दूषित पाणी बाहेर काढून विहिर स्वच्छ करावी लागणार असल्याने या भागाचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे या भागातील जवळपास 70 हजार रहिवाशांना पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.
शहरात बुधवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नाल्याला आलेल्या पुराच्या आणि त्यासमवेतची घाण पाणी गुरुवारी दुपारी बारांगणे मळ्यातील विहिरीत शिरले. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. (Latest Pune News)
दरम्यान, हा प्रकार समजल्यानंतर महापालिकेकडून त्वरित पाणी पुरवठा बंद करण्यात आला. विहिरीतील घाण पाणी बाहेर काढून, स्वच्छ केली जाईल. त्यानंतरच धायरी, डीएसके विश्व व अन्य भागात पाणी पुरवठा केला जाईल, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने धायरी गावासाठी टँकरने पाणी पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, डीएसके विश्वसारख्या मोठ्या सोसायट्यांमध्ये टँकरने कितीपत पाणी पुरवठा होणार असा प्रश्न आहे. त्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण होणार आहे.
या प्रकाराबाबत या भागातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल पोकळे म्हणाले, परिसरातील नाल्याचे व सांडपाणी वाहिनीतील पाणी विहिरीत गेले आहे. त्याची तक्रार केल्यानंतर प्रशासन जागे झाले आहे. पाणी उपसा करण्याचे काम सुरू केले आहे.
आधी जीबीएसचा त्रास
धायरी, डीएसके विश्व, किरकटवाडी, नर्हे, नांदेड या सिंहगड रस्ता परिसरात दूषित पाणी पुरवठ्यामुळे गुलियन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळून आले होते. महापालिकेने पाण्याची तपासणी केली असता या भागातील जलस्रोत दूषित असल्याचे निष्पन्न झाले. हा भाग जीबीएस ग्रस्त असताना आता विहिर दूषित पाणी शिरल्याने पुन्हा एकदा येथील नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे.