पुणे

बारामती : लाचप्रकरणी वडगाव निंबाळकरच्या दोन पोलिसांवर एसीबीकडून गुन्हा

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा

कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात तक्रारदाराला अटक न करण्यासाठी ४० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार शिवाजी सातव (वय ५२) व पोलिस नाईक गोपाळ जाधव (वय ३५) अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एका ६७ वर्षीय तक्रारदाराने यासंबंधी एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदार व त्याच्या कुटुंबियांविरोधात वडगाव पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी या दोघांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे आली होती.

या तक्रारीची पडताळणी केली असता या गुन्ह्याचा तपास गोपाळ जाधव हे करत असल्याचे दिसून आले. तक्रादारांना अटक न करण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी या दोघांनी त्यांच्याकडे २५ हजार रुपये व चौकीसाठी प्रिंटर घेण्यासाठी १५ हजार रुपये अशा ४० हजारांच्या लाचेची मागणी केली. ही कारवाई पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर अधिक्षक सूरज सातव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT