ललित पाटीलप्रकरणी आणखी दोन पोलिस बडतर्फ File Photo
पुणे

Lalit Patil Case| ललित पाटीलप्रकरणी आणखी दोन पोलिस बडतर्फ

पुढारी वृत्तसेवा

ड्रगतस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातील पलायन प्रकरणात आणखी दोन पोलिसांना खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस हवालदार आदेश सीताराम शिवणकर आणि पोलिस शिपाई पीराप्पा दत्तू बनसोडे, अशी दोघांची नावे आहेत. याबाबतचे आदेश अपर पोलिस आयुक्त प्रशासन अरविंद चावरिया यांनी दिले आहेत.

दरम्यान, दोघे पोलिस कर्मचारी सध्या निलंबित असून, त्यांची या प्रकरणात विभागीय चौकशी सुरू होती. चौकशीअंती ही कारवाई केल्याचे आदेशात म्हटले आहे. यापूर्वी पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, पोलिस नाईक नाथाराम भारत काळे आणि पोलिस शिपाई अमित सुरेश जाधव, रमेश काळे आणि दिगंबर चंदनशिव या पाच जणांना पोलिस दलातून बडतर्फ (शासकीय सेवेतून बडतर्फ) केले आहे.

आत्तापर्यंत या प्रकरणात सात जणांना बडतर्फ (खात्यातून काढून टाकणे) केले आहे. एखाद्या प्रकरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पोलिस बडतर्फ केले आहेत. २ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलिस कर्मचारी शिवणकर, काळे, बनसोडे आणि जाधव असे चौघे ससून रुग्णालयातील रुग्णबंदी वॉर्ड क्रमांक १६ येथे गार्ड कर्तव्यावर होते. त्यांच्यावर देखरेख अधिकारी म्हणून मोहिनी डोंगरे होत्या.

आरोपी ललित पाटील याने रात्री साडेसात ते पावणेआठ वाजताच्या सुमारास पोलिस कर्मचारी काळे यांच्या ताब्यातून ससून रुग्णालयातून पळ काढला. एक्स-रे काढण्यासाठी घेऊन जात असताना त्याने पलायन केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मात्र, ललित पाटील याने पळ काढल्यानंतर देखील कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला रात्री उशिरा सव्वादहाच्या सुमारास दिली. त्यामुळे आरोपीला पळून जाण्यास संधी मिळाली. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा पोलिस कर्मचारी शिवणकर आणि बनसोडे हेदेखील तेथे उपस्थित होते.

ललित पाटीलने पलायन केल्यानंतर दोघांनी नियंत्रण कक्षाला त्याची माहिती देणे अपेक्षित होते. तसेच, ललित पाटील एक्स-रेसाठी खाली काळे यांच्यासोबत गेल्यानंतर अर्ध्या तासाचा कालावधी लोटल्यानंतर देखील दोघांनी तो का परत येत नाही, याची खात्री केली नाही. तसेच त्याला वॉर्डमधून बाहेर काढताना पुरेशी खबरदारी घेण्यात आली नाही. दोघांना कायद्याचे ज्ञान असताना त्यांनी कर्तव्यात अक्षम्य हलगर्जीपणा, निष्काळजीपणा करून कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचा ठपका दोघांवर ठेवला आहे.

तसेच, दोघांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याचे सिद्ध होत असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर दोघांच्या वर्तणुकीमुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याने त्यांना खात्यातून बडतर्फ केल्याचे अपर पोलिस आयुक्त प्रशासन अरविंद चावरिया यांनी म्हटले आहे. शिक्षेविरुद्ध या दोघा कर्मचाऱ्यांना ६० दिवसांत अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे अपील करता येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT