पुणे : पुढारी वृत्तसेवा
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दुर्गराज रायगडावर 5 व 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे समनव्यक अमित गायकवाड, धनंजय जाधव, विराज तावरे, मालोजी जगदाळे आणि किरण काची यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती आणि युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने 5 जून रोजी सायंकाळी 5 वाजता नगारखाना येथे गडपूजन होणार असून त्यानंतर होळीचा माळ येथे धार तलवारीचा… युद्धकला महाराष्ट्राची…, हत्तीखाना येथे गतवैभव रायगडाचे कार्य सादरीकरण, राज दरबार येथे जागर शिवशाहिरांचा, शिरकाई मंदिर येथे गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, वारकरी संप्रदायाकडून कीर्तन, जागर व काकड आरती होणार असल्याचे गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
या सोहळ्यात 6 जून रोजी नगारखाना येथे सकाळी 6 वाजता ध्वजपूजन, ध्वजारोहण आणि रणवाद्यांचा गजर, शाहिरी कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, युवराज संभाजी छत्रपती यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर सोहळा पालखीचा… स्वराज्याचा ऐक्याचा हा शिवराज्याभिषेक मुख्य पालखी सोहळ्यास प्रारंभ होणार असून जगदीश्वराचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचा समारोप होणार असल्याचे, जाधव आणि तावरे यांनी सांगितले.