पुणे

बोगद्यांची निर्मिती हाच वाहतुकीवर चांगला पर्याय; तोच प्रगतीचा मार्ग

अमृता चौगुले

गणेश खळदकर

पुणे : सध्या रस्त्यांवरील उड्डाणपूल हे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे दिसते. त्यामुळे बोगद्यांची निर्मिती हाच वाहतुकीवर चांगला पर्याय असून भविष्यात तोच प्रगतीचा मार्ग राहणार आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
देशात सध्या वेगवान पद्धतीने बोगद्यांची निर्मिती होत असून टनेल इंजिनिअरिंग तसेच स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी असल्याची माहितीही तज्ज्ञांनी दिली आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या टनेल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पोतनीस म्हणाले, 'उड्डाणपूल जरी बांधले तरी फक्त दोन किंवा तीन चौक ओलांडण्यासाठी त्याचा उपयोग होतो, परंतु उड्डाणपूल जेव्हा परत मुख्य रस्त्यावर उतरतो, त्या ठिकाणी, परत त्याच्या रुंदीइतकाच रस्ता लागतो. त्यामुळे वाहतूक हाताळण्यात त्यांचा अपेक्षित उपयोग होत नाही आणि भविष्यातील शहराच्या विकासाकरिता उड्डाणपूल अडथळा वाटू लागतात. आपण नवीन जमीन निर्माण करू शकत नाही. वाहनांच्या संख्येवर नियंत्रण घालू शकत नाही, अशा परिस्थितीत जमिनीखालून वाहतुकीची व्यवस्था करणे हाच पर्याय शिल्लक राहतो.' सध्या बोगदे बनविण्यासाठी उपलब्ध असलेल्या आणि सातत्याने तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या बदलांमुळे काम अत्यंत वेगाने करता येत आहे, असे डॉ. पोतनीस यांनी सांगितले.

भारतात बोगदे अभियंत्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. कारण बोगदे असलेल्या 7.5 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये टनेल इंजिनिअरिंगमध्ये एमटेक आहे. आमचे सर्व एमटेक झालेले टनेल अभियंते चांगल्या पॅकेजेससह बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करीत आहेत.

                           – डॉ. प्रसाद खांडेकर, प्र-कुलगुरू, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी

भारतामध्ये येत्या दहा वर्षांमध्ये एक लाख कोटी रुपयांची बोगदे आणि भूमिगत बांधकामांची कामे होणार आहेत. यामध्ये रस्ते बोगदे, रेल्वे बोगदे, मेट्रो बोगदे, कच्चे तेल साठवण्यासाठी गुहा, आण्विक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत भांडार, भूमिगत वाहन पार्किंग यांचा समावेश आहे. या कामांसाठी बहुसंख्य बोगदा अभियंत्यांची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ही सुसंधी आहे.

                        – शामकांत धर्माधिकारी, अध्यक्ष, महामार्ग व बोगदा सल्लागार समिती.

बोगद्यांमुळे काय होते…

  • प्रकल्पाची किंमत कमी होऊ शकते.
  • पर्यावरणाचा र्‍हास टाळता येऊ शकतो.
  • बोगद्यांमधून रस्ता नेल्यास कमी लांबीचा रस्ता लागतो.
  • इंधनाची, वेळेची बचत होऊन सुरक्षित प्रवास होतो.

सध्या सुरू आहेत हे प्रकल्प

  • प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत समुद्राच्या खालून बोगदा
  • रुद्रप्रयाग व कर्णप्रयाग या ठिकाणी रेल्वेबोगदा
  • कुलु- मनाली महामार्गावर अनेक बोगद्यांचे काम प्रगतिपथावर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT