Tuljabhavani Pudhari
पुणे

Tuljabhavani Temple Historical Records: तुळजाभवानीच्या नंदादीपासाठी पेशव्यांनी गावाचे उत्पन्न लावले; १७६६ च्या अप्रकाशित मोडी पत्रातून ऐतिहासिक माहिती उजेडात

थोरले माधवराव पेशव्यांची सरदार शहाजी भापकर यांना आज्ञा; दख्खन इतिहास संशोधन संस्थेच्या संशोधकांना पुणे पुरालेखागारात महत्त्वाचे पत्र सापडले

पुढारी वृत्तसेवा

लोणी भापकर: श्री क्षेत्र तुळजापूरच्या भवानी देवीच्या नंदादीप (देवीपुढे सतत जळत राहणारा दिवा) व नैवद्याच्या खर्चासाठी पेशव्यांकडून सरदार शहाजी भापकर यांच्या सरंजामातील गोउर खुर्द (सध्या कर्नाटक राज्यात ता. अफझलपूर, जिल्हा- गुलबर्गा) या गावाचे उत्पन्न लावून देण्यात आले होते.

पुणे येथील दख्खन इतिहास संशोधन संस्थेचे संशोधक प्रा. दत्तात्रय जगताप, निखिल भापकर व प्रदीप भापकर यांच्या संशोधनातून ही महत्त्वपूर्ण माहिती उजेडात आली आहे. यासंबंधीचे मोडी पत्र पुणे पुरालेखागारातील घडणी दप्तरातून प्राप्त झाले असून, त्याचे देवनागरी लिप्यंतर निखिल भापकर यांनी केले.

प्रा. जगताप यांनी सांगितले, “उदगीरच्या लढाईनंतर झालेल्या तहानुसार (१७६०) कर्नाटकातील अफजलपूर आणि होर्टी हे निजामाचे परगणे मराठ्यांच्या राज्यास जोडण्यात आले. जानेवारी १७६४ मध्ये हे परगणे थोरल्या माधवराव पेशव्यांकडून शहाजी भापकर यांना सरंजाम म्हणून देण्यात आले. जानेवारी १७६६ मध्ये पेशवा थोरले माधवराव आणि निजामाचे सरदार रामचंद्र जाधवराव यांनी नागपूरकर भोसल्यांवर एकत्रित मोहीम केली होती. त्यादरम्यान रामचंद्र जाधवराव यांनी केलेल्या विनंतीवरून सदर पत्र पेशव्यांनी शहाजी भापकर यांस लिहिले आहे. या पत्राची सुरुवात 'राजमंडळ स्वारी राजश्री पंतप्रधान' अशी करण्यात आली आहे.

गुरुवार, १३ मार्च १७६६ रोजी लिहिलेल्या या अप्रकाशित पत्रानुसार, अफजलपूर परगण्यातील गोउर खुर्द या गावाचे उत्पन्न (महसूल) हैद्राबादच्या निजामाचे सरदार चंद्रसेन जाधवराव (१७०९-१७५१) यांनी यापूर्वी श्री क्षेत्र तुळजापूरच्या देवीच्या नंदादीप व नैवद्यासाठी लावून दिले होते. हीच व्यवस्था पूर्वीप्रमाणे चालवावी, अशी विनंती दिवंगत चंद्रसेन यांचे पुत्र रामचंद्र जाधवराव यांनी पेशव्यांकडे केली. त्यानुसार पेशवा थोरल्या माधवरावांनी अफजलपूर परगण्याचे सरंजामदार शहाजी भापकर यांना आज्ञा केली की, त्यांनी पूर्वी चालत आलेल्या व्यवस्थेप्रमाणे गोउर खुर्द या गावाचे उत्पन्न श्री क्षेत्र तुळजापूरच्या देवीच्या नंदादीप व नैवद्यासाठी चालवावे. त्याचप्रमाणे या कागदपत्राच्या शेवटी खाली आलेल्या नोंदीनुसार पेशव्यांच्या चिटणिसी कार्यालयाकडून याविषयीची खासा सनद नव्याने जारी करण्यात आल्याची माहिती मिळते.”

“बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावातील सरदार भापकर घराणे हे मातब्बर सरंजामी सरदार घराणे होते. या अप्रकाशित कागदपत्रातून भापकर आणि जाधवराव घराण्यांच्या धर्मविषयक प्रशासकीय अधिकारांवर महत्त्वपूर्ण प्रकाश पडतो. निजामाचा हिंदू सरदार त्याच्या सरंजामातील गावाचे उत्पन्न तुळजापूरच्या देवीच्या नंदादीप व नैवेद्यासाठी लावून देतो ही विशेष बाब आहे. शहाजी भापकर हे केवळ लष्करी मोहिमा चालविणारे सरदार नसून, तुळजापूरसारख्या महत्त्वाच्या धार्मिक क्षेत्रांसाठी ज्या गावांचे उत्पन्न लावून देण्यात आले होते, त्याचे व्यवस्थापन सांभाळणारे जबाबदार प्रशासक होते, हे या कागदपत्रातून सिद्ध होते.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT