Party Pudhari
पुणे

Tulapur Rave Party: तुळापूर ‘प्रोजेक्ट एक्स’ रेव्ह पार्टी प्रकरण; ७८ जणांवर गुन्हे, सहा दिवसांनंतरही तपास संथ

मद्य, हुक्का आणि गांजाप्रकरणी पोलिसांची कारवाई; मात्र मुख्य नेटवर्कपर्यंत तपास पोहोचला नसल्याने प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पुणे: तुळापूर येथील कथित 'प्रोजेक्ट एक्स' हाऊस रेव्ह पार्टीवर कारवाई करत पोलिसांनी आयोजकांसह तब्बल ७८ जणांविरोधात गुन्हे दाखल केले. मात्र, या कारवाईनंतर सहा दिवस उलटूनही तपासात ठोस प्रगती झालेली नसल्याने संपूर्ण कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

खरं तर पार्टीत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला होता. हे मद्य नेमके कोठून आणले गेले, ते बनावट होते का, तसेच हुक्क्याचा पुरवठा कोणी केला, गांजा मिळून आला होता. तो गांजा कोणी आणला. पार्टीत इतर कोणते अमली पदार्थ वापरले का, याबाबत अद्याप पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. पार्टी आयोजनामध्ये मिल्स परिसरातील नामांकित पबचे मालक सहभागी होते. सोशल मीडियावर कार्यरत असलेल्या एका विशिष्ट गटाकडून या पार्टीची जाहिरात आणि बुकिंग करण्यात आली होती. आफ्टर पार्टीसाठी हे गट प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे पोलिसांनी अद्याप चौकशी केली आहे की नाही, हे समजू शकलेले नाही.

तुळापूरमधील एका आलिशान बंगल्यात 'प्रोजेक्ट एक्स' हाऊस पार्टीचे आयोजन केले होते. पोलिसांनी छापा टाकून साडेनऊ लाखांहून अधिक किमतीच्या मद्याच्या बाटल्या, प्रतिबंधित १० हुक्का पॉट्स आणि इतर साहित्य जप्त केले होते. मंगळवारी सातपैकी यश चौधरीसह दोन प्रमुख आयोजकांची चौकशी करण्यात आली. पार्टीसाठी मद्य व हुक्का नेमका कोठून आणला गेला, याबाबत तपास करण्यात आला. तसेच पार्टीचे नियोजन कधी झाले, आणखी कोणाचा सहभाग होता का, याची देखील माहिती पोलिसांनी घेतली. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागले नसल्याचे दिसून येते.

दरम्यान, यापूर्वीही संबंधित आयोजकाने दिल्लीत अशाच प्रकारच्या पार्ट्यांचे आयोजन केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तरीदेखील पोलिस या संपूर्ण नेटवर्कच्या मुळाशी पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे खुलेआम आणि राजरोसपणे अवैध पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्यांवर कोणताही प्रभावी अंकुश नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

परवानगी रात्री साडेअकरापर्यंत; पहाटे अडीचपर्यंत धांगडधिंगा?

तुळापूर येथील या पार्टीला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून रात्री साडेअकरापर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही पहाटे अडीच वाजेपर्यंत पार्टी सुरू असल्याचे समोर आले. यावेळी मोठ्या प्रमाणात मद्यसाठाही आढळून आला. त्यामुळे नेमकी किती मद्यसाठ्याची परवानगी देण्यात आली होती, जप्त केलेले मद्य कुठून आले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT