Tukaram Mundhe Pudhari
पुणे

Tukaram Mundhe FDA Action: नियमभंग करणाऱ्यांचे परवाने आता थेट रद्द करणार; तुकाराम मुंढेंचा व्यावसायिकांना इशारा

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई अधिक कठोर; प्रोटीन पावडरच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरही कारवाई, तपासणी अहवाल आता १४ दिवसांत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यभरात अन्‍न, औषध प्रशासनाकडून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करूनही कुठलाच फरक पडत नसेल, तर येथून पुढे संबंधित व्यावसायिकांचे, आस्थापानांचे केवळ परवाने केवळ निलंबित करणार नसून थेट रद्द करण्यात येतील, असा इशारा विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दिला.

तसेच प्रोटीन पावडर, प्रयोगशाळांमधील तपासणी अहवाल, अपुरे मनुष्यबळ आणि इतर विषयांवरही माहिती दिली. पुण्यात आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना हा इशारा दिला. तसेच, अनेक जिममध्ये प्रशिक्षक, कर्मचारी तरुणांना ‘ही पावडर खाल्ल्याने स्नायू झटपट वाढतील’ असे सांगून परस्पर प्रोटीन पावडर विकतात.

मात्र, या उत्पादनांवर कोणतेही वैद्यकीय फायदे असल्याचा दावा करण्याचा कायदेशीर अधिकार उत्पादक किंवा विक्रेत्यांना नाही. ‘एफएसएसएआय’ परवाना घेतल्यानंतरही चुकीचे आणि दिशाभूल करणारे पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

उत्पादनाच्या दर्जाची जबाबदारी केवळ उत्पादकाची नसून, ती विकणाऱ्या होलसेल आणि रिटेलरची देखील तेवढ्याच प्रमाणात आहे. त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्यांवरही कायद्याचा बडगा उगारला जाईल, असे मुंढे यांनी सांगितले.

आता १४ दिवसांच्या आत अहवाल

अन्‍न औषध प्रशासनाकडून हॉटेल्स, तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर जोरदार कारवाई सुरू असून, कारवाईचा अहवाल येण्यास ३० दिवसांपासून सहा महिन्यांपर्यंतचा कालावधी लागत असे. मात्र, आता प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यात आली असून, आधुनिक उपकरणे आणि वाढीव मनुष्यबळासह शिफ्टमध्ये काम सुरू आहे. यामुळे आता साधारण १० ते १४ दिवसांत अहवाल प्राप्त होत आहे. हा कालावधी आणखी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे, असे मुंढे यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT