इंदापूर: जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी (दि.१ जुलै) इंदापूर तालुक्यातील सराटी गावातील शेवटचा मुक्काम आटोपून सोलापूर जिल्ह्याकडे रवाना आला. प्रथम नीरा नदीमध्ये पादुकांना पवित्र स्नान घालण्यात आले. सोमवारी (दि. ३० जून) इंदापूर तालुक्यातील सराटी गावात पालखी मुक्कामी विसावला होता. पालखी सोहळ्याने निरा स्नान झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.
मंगळवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी देहू संस्थांच्या वतीने व स्थानिक प्रमुख ग्रामस्थ, मान्यवरांच्या हस्ते नीरा नदी पात्रात पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. नदीपात्रात पादुकांवर पाणी, दही, दूधाचा अभिषेक, चंदन, हळदीचा अभिषेक करून अष्टगंध, बुक्का लावून आरती झाली. यावेळी हजारो वैष्णवांनी तुकोबारायांचा जयघोष केला व पादुकावर पुष्पवृष्टी करण्यात आली. (Latest Pune News)
निरास्नान झाल्यानंतर पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत अकलूज येथे प्रवेश केला. सकाळच्या या रम्य सोहळयाने वैष्णव आनंदला. दुष्काळामुळे मागील काही वर्षात तुकोबारायांचे पादुका स्नान हे टँकर मधील पाण्याच्या साह्याने करण्यात येत होते. परंतु यावर्षी पहिल्यांदाच एन उन्हाळ्यात नीरा नदी परिसरातील पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे नदीपात्रात पाणी वाहते आहे. या वेळी हजारो वैष्णवांनी नदीपात्रात डुंबण्याचा आनंदही साजरा केला.
प्रवेशापूर्वी सोलापूर आणि पुणे जिल्हा यांची सीमा असलेल्या नीरा नदी पात्रात तुकोबारायांच्या पादुकांना निरास्नान घालण्याची परंपरा आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील चार मुक्काम आटोपून पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात जाताना पुणे जिल्ह्यातील व इंदापूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जड अंतकरणाने सोहळ्यास निरोप दिला.
सोलापूर जिल्ह्यात सोहळ्याने प्रवेश केल्यानंतर संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाचे तिसरे गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील अकलूज या ठिकाणी सदाशिवराव माने विद्यालयात पार पडणार आहे.